Akola ZP : अर्थ समितीने दिली ३५ कोटींच्या तरतुदीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:31 PM2020-03-14T12:31:55+5:302020-03-14T12:32:06+5:30
मुख्य वित्त व लेखा अधिकारी विद्या पवार यांनी समितीसमोर अर्थसंकल्प ठेवला
अकोला : येत्या अर्थसंकल्पीय सभेत मंजुरीसाठी ठेवल्या अर्थसंकल्पातील ३५ कोटींच्या तरतुदीसह सुधारित ३९ कोटींच्या तरतुदीला अर्थ समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत विशेष तरतुदी करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तयार करताना २०१९-२० मध्ये मूळ तरतूद २८ कोटी, सुधारित तरतूद ३९ कोटी, तर ३५ कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील रुग्णांना डोळ्यांच्या आजारासह मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी जिल्हा परिषदेकडून शिबिरांचे आयोजन करणे, त्यासाठी सदस्य पुष्पा इंगळे यांनी मागणी केली. त्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी सदस्य विनोद देशमुख यांच्यासह समिती सचिव तथा मुख्य वित्त व लेखा अधिकारी विद्या पवार यांनी समितीसमोर अर्थसंकल्प ठेवला. किरकोळ दुरुस्तीसह त्याला मंजुरी मिळाली. यावेळी प्रथमच जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.