Akola ZP : अखेरच्या पाच मिनिटात चवथे सभापतीपदही ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:21 PM2020-01-31T12:21:26+5:302020-01-31T12:21:33+5:30

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या पाच मिनिटांआधी चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा अर्ज दाखल करत ते सभापतीपदही ताब्यात ठेवण्यात भारिप-बमसंला यश मिळाले.

Akola ZP: in the last five minutes also hold the fourth post | Akola ZP : अखेरच्या पाच मिनिटात चवथे सभापतीपदही ताब्यात

Akola ZP : अखेरच्या पाच मिनिटात चवथे सभापतीपदही ताब्यात

Next

- सदानंद सिरसाट  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सभापती पदाच्या निवडीसाठी लागणाऱ्या बहुमताची संख्या टिकवण्यासाठी समविचारी पक्ष सोबत येतील, त्यांना एक सभापतीपद द्यावे लागणार, हे गृहीत धरून भारिप-बमसंने चारपैकी तीन सभापती पदांसाठी अर्ज दाखल केले. अखेरपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसोबत महाविकास आघाडीमध्ये कायम राहिले. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या पाच मिनिटांआधी चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा अर्ज दाखल करत ते सभापतीपदही ताब्यात ठेवण्यात भारिप-बमसंला यश मिळाले.
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत भाजपचे सदस्य तटस्थ राहिले. सभापती पदाच्या निवडीच्या वेळी हीच परिस्थिती असेल की नाही, याबाबत साशंकता होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या समविचारी पक्षाचे पाठबळ मिळेल, ही अपेक्षा भारिप-बमसंच्या नेत्यांना होती. तसे प्रयत्नही करण्यात आले; मात्र या तीनही पक्षांची महाविकास आघाडी अभेद्य राहिली. तर दुसरीकडेही भाजपही तटस्थ राहिला. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना, काँग्रेससोबत सत्तेत सहभागी व्हायचे नाही किंवा सहकार्य करायचे नाही, तर भारिप-बमसंलाही पाठिंबा द्यायचा नाही, असे स्पष्ट निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले. बहुमत असलेल्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करू द्यावी, त्यासाठी निवड प्रक्रियेदरम्यान सभागृहात उपस्थित न राहणेच चांगले, त्यामुळेच भाजपचे सदस्य अनुपस्थित राहिले. भाजपचा हा पवित्रा भारिप-बमसंच्या पथ्यावर पडला. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणारा ठरला आहे.
भारिप-बमसंने अर्ज दाखल न केलेल्या एका सभापतीसाठी अखेरच्या पाच मिनिटांत चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचे नाव पुढे करण्यात आले. त्यानंतर सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये चारही सभापतीपद भारिप-बमसंच्या ताब्यात आले. यावेळी भारिप-बमसंच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेत एकच जल्लोष केला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्षा सावित्री राठोड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेतून अशोक वाटिकेपर्यंत मिरवणूक काढली.

पांडे गुरुजींना अखेर सभापतीपद
चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सलग चौथ्यांदा जिल्हा परिषदेचे सभागृह गाठले आहे. गेल्या तीन कार्यकाळात सत्तापदावर नियुक्तीपासून त्यांना हुलकावणी मिळाली. भारिप-बमसंचे उमेदवार म्हणून निवडणूक लढल्यानंतर त्यांना प्रथमच सभापतीपद देण्यात आले आले.

सर्व पदाधिकारी नवखे
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजणे, उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश सिरसाट, महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे, सभापती पंजाबराव वडाळ हे सर्वच पदाधिकारी सभागृहात नवखे आहेत. त्यांना जिल्हा परिषद समजून घ्यावी लागणार आहे.

भाजपचे सदस्य दिवसभर एकत्र
भाजपचे सातही सदस्य पक्ष पदाधिकाऱ्यांसह शहरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते बाहेर पडले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर विजय अग्रवाल, तालुकाध्यक्ष अंबादास उमाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Akola ZP: in the last five minutes also hold the fourth post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.