Akola ZP : आघाडीत बैठकीच्या फेऱ्या; भारिप-बमसंला ठाम विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:49 AM2020-01-17T10:49:56+5:302020-01-17T10:50:03+5:30
महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये रात्री उशिरापर्यंतही एकमत होऊ शकले नाही. भारिप-बमसंकडून ठामपणे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात महाविकास आघाडीची मोट बांधण्यासाठी गुरुवारी दिवसभरात शहरातील हॉटेलमध्ये ‘ब्रेक के बाद’ सातत्याने बैठकांच्या फेºया झाल्या, तरीही महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये रात्री उशिरापर्यंतही एकमत होऊ शकले नाही. भारिप-बमसंकडून ठामपणे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. तसेच अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच असलेल्या नावांबाबत उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची महाविकास आघाडी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची तयारी करीत आहे. त्यासाठी भाजपचे पाठबळ आवश्यक आहे. या चार पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापनेचे सूत्र ठरविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी गुरुवारी दिवसभर बैठका घेतल्या. जिल्हा परिषदेत भारिप-बमसंनंतर दुसºया क्रमांकाची सदस्य संख्या असलेला पक्ष शिवसेना आहे. महाविकास आघाडीत अध्यक्षपद शिवसेनेकडेच जायला हवे, हे नैसर्गिक असताना भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवताना शिवसेनेच्या ताटातही माती कालवण्याचा प्रकार या बैठकांतील चर्चेमध्ये घडला. सोबतच जिल्हा परिषदेच्या सत्ता पदांची चार पक्षांमध्ये विभागणी करणे, त्यावर त्यांचे समाधान होणे, ही बाब जिकिरीची ठरली आहे. त्यामुळे रात्री ८ वाजतापर्यंत या चारही पक्षांच्या नेत्यांमध्ये तीन बैठका पार पडल्यानंतरही त्यातून ठोस निर्णय पुढे आलेला नव्हता. या बैठकीला चारही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते.
भाजपसोबत सत्ता स्थापनेच्या मुद्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहेत. भाजपकडून चर्चेसंदर्भात कोणताही निरोप अद्याप आलेला नाही.
- आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
भारिपचे सदस्य थेट सभागृहातच पोहोचणार!
भारिप-बमसंकडून सत्ता स्थापनेचा ठाम दावा केला जात आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड होईपर्यंत कुणाच्या पाठबळाने सत्ता स्थापन केली जाईल, हे सभागृहातच दिसेल, असा पवित्रा या नेत्यांकडून घेतला जात आहे.
अध्यक्ष पदाबाबत उत्कंठा
जिल्हा परिषदेत भारिप-बमसंकडून सत्ता स्थापन झाल्यास अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोणाची निवड होते, याबाबत जिल्ह्यात उत्कंठा आहे. जिल्ह्यातील दोन मोठ्या समाजगटांमध्ये ही दोन्ही पदे विभागली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची नावे निश्चित होणार आहेत. नेहमीप्रमाणे ऐनवेळी अर्ज दाखल करतानाच ती उघड होणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या नावांबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.
शिवसेनेलाही सत्तेपासून दूर ठेवा!
भाजपने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेना सोडून इतरांना द्यावे, असा पवित्रा घेतला. भारिप-बमसं सोबतच शिवसेनेलाही सत्तेपासून दूर ठेवत असाल, तरच महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा पवित्रा भाजपच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे. भाजपच्या या पवित्र्याने महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हेतूलाच तडा बसण्याची शक्यता निर्माण झाली.