डासांच्या उद्रेकामुळे अकोलेकर त्रस्त: उपाय निष्फळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 02:04 PM2019-03-10T14:04:39+5:302019-03-10T14:05:16+5:30
अकोला: तापमानात बदल होताच अकोल्यात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डासांना त्रासलेल्या अकोलेकरांची रात्रीची झोप उडाली आहे.
अकोला: तापमानात बदल होताच अकोल्यात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डासांना त्रासलेल्या अकोलेकरांची रात्रीची झोप उडाली आहे. महापालिकेच्या उपाययोजना सर्व निष्फळ ठरत असून, लोकांना डासांच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त खर्च करून व्यक्तिगत उपाययोजना करावी लागत आहे. महानगराच्या १२० किलोमीटरच्या परिघात धुराळणी करण्यासाठी महापालिकेकडे केवळ सहा फॉगिंग मशीन उपलब्ध असल्याने ही अवस्था झाली आहे. इतर ३६ फॉगिंग मशीन भंगारात पडल्या असून, मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अकोल्यात मलेरिया, डेंग्यूसारखे साथीच्या रोगाचा सामना अकोलेकरांना करावा लागत आहे.
अकोला शहराची लोकसंख्या सात लाखांच्या घरात पोहोचली असून, अकोला महापालिकेच्या २० प्रभागांचे कार्यक्षेत्र १२० किलोमीटरच्या परिघात विस्तारले आहे. नव्याने महापालिका क्षेत्रात आलेल्या वसाहतींची अवस्था तर त्याहूनही वाईट आहे, तिथपर्यंत महापालिकेची यंत्रणा अद्याप पोहोचली नाही. वर्षात केवळ तीनदा फॉगिंग मशीन पोहोचत असल्याचे समोर आले आहे. विस्तारित २० प्रभागांसाठी अतिरिक्त फॉगिंग मशीनची आवश्यकता असतानाही नाममात्र सहा फॉगिंग मशीनवर कार्यभार उरकला जातो आहे.
मनपाच्या नोंदीत एकूण ४२ फॉगिंग मशीन आहेत. यातील ३६ मशीन भंगारात पडून असून, केवळ सहा मशीन सेवा देण्याच्या स्थितीत आहेत. दोन महिन्यांत पेट्रोल डीझलच्या किमती वाढल्याने सहा मशीनही बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात दिव्यांग असून, अनेकजण सेवानिवृत्त झाले आहे. मनपाच्या मलेरिया विभागात एकूण ३० कर्मचारी कार्यरत असून, औषधे फवारणीसाठी सहा आणि फॉगिंग मशीनची धुराळणी करण्यासाठी २४ कर्मचारी कार्यरत आहेत.
उपाय निष्फळ
मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. फारूख शेख यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, धुराळणी आणि औषधांची फवारणी निष्फळ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांत पुन्हा डासांची संख्या वाढत असून, कर्मचारी यासाठी कमी पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवकांचा संताप निरर्थक
आमसभेत मनपा नगरसेवकांनी डासांच्या प्रादुर्भावासंदर्भात संताप व्यक्त केला होता. शहरातील डासांमुळे साथीचे रोग वाढले असून, नागरिक महापालिकेवर रोष काढीत आहेत, असे नगरसेवकांनी सभेत निदर्शनास आणून दिले होते. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या; मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही.
आरोग्य विभागाची डोळेझाक
शहरात अनेक खुले भूखंड आहेत, ज्या भूखंडात परिसरातील घाण सांडपाणी साचले आहे. त्यामुळे डासांचा उद्रेक झाला आहे. आरोग्य विभागाने अशा भूखंडधारकांवर आणि सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी; मात्र आरोग्य विभाग याकडे डोळेझाक करीत आहे.