नीट परीक्षेत अकोल्याच्या काटेचा ‘विक्रम’!
By Admin | Published: June 24, 2017 05:57 AM2017-06-24T05:57:05+5:302017-06-24T05:57:05+5:30
ओबीसीमधून राज्यात पहिला, अकोल्यातील विद्यार्थ्यांची नीट परीक्षेत बाजी.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. अकोल्यातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. राजेश काटे यांचा मुलगा विक्रम काटे याने नीट परीक्षेमध्ये ओबीसी प्रवर्गातून राज्यातून पहिला, तर विद्यार्थ्यांमधून राज्यात दुसरा क्रमांक आणि भारतातून सातवा क्रमांक पटकावला. विक्रमने ७२0 पैकी ६७३ गुण पटकावून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
नीट (एनईईटी) ही परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाते. देशात एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी (एआयआयएमएस व जेआयपीएमईआर) वगळून एकच नीट परीक्षा देशपातळीवर घेण्यात आली. यावर्षी ही परीक्षा दहा स्थानिक भाषांमध्ये व २६ वेगवेगळय़ा सेटमध्ये घेण्यात आली. परीक्षेसाठी देशभरातील १0३ शहरांमध्ये १0४६ केंद्रांवर ११ लाख ३८ हजार ८९0 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा नीट परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी वापरून अभ्यास केल्यामुळे पहिल्यांदा अकोल्यातून जिपमरसारख्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. विक्रम काटे याने यापूर्वीच जिपमर या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत दोन लाख विद्यार्थ्यांमधून ओबीसी प्रवर्गात २0 वा क्रमांक पटकावला. नीटमध्ये राष्ट्रीय २0 व्या क्रमांकावरून त्याने एकदम सातव्या क्रमांकावर झेप घेतली, हे कौतुकास्पद आहे. एवढेच नाही, तर त्याने जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये भारतातून प्रथम ३0 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. विक्रमसोबतच त्याचे सहकारी आकाश मंत्री याने ६५५ गुण (एआयआर २५0), गौरी भंसाली हिने ६३६ (एआयआर ६६९), यशपाल पाकळ याने ६३५ (एआयआर १३१), जितेश भिरड याने ६0५ (एआयआर ६१३), गौरी पांडे हिने ६0७ (एआयआर २२१८), सौरभ खिडकीकर याने ६0५, साक्षी सोमाणी हिने ५९७, धनंजय सहस्रबुद्धे याने ५८६ गुण, राधिका मल हिने ५७३ गुण, देवनिधी पाटील हिने ५३९ गुण, ओम गवई याने ५२६ (एआयआर २३९), ऋग्वेद ढोरे याने ५२१ गुण, राधा टोम्पे हिने ५१३ गुण, गार्गी देशमुख हिने ५0१, पलक गोठी हिने ४९0, प्रणव खडके याने ४७५, संकेत निरबान याने ४५७ गुण प्राप्त केले.
पालकमंत्र्यांचा मुलगा शर्व पाटील पुन्हा चमकला
जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील राजकारणात चमकदार कामगिरी करीत असताना, त्यांचा मुलगा शर्व पाटील हा कसा मागे राहील, वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत शर्वनेसुद्धा नाव उज्ज्वल करीत नीट परीक्षेत ६५७ गुण प्राप्त करीत घवघवीत यश प्राप्त केले. बारावीच्या परीक्षेतसुद्धा ९५.८५ टक्के गुण मिळविले. दहावीच्या परीक्षेतसुद्धा शर्वने राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला होता.