मुख्यमंत्र्यांच्या लोकसंवादात अकोला वेटींगवरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:54 PM2019-01-15T13:54:00+5:302019-01-15T13:55:23+5:30
अकोल्याचे शेतकरी संवादासाठी सकाळी ११ वाजतापासून उपस्थित होते; मात्र त्यांचा नंबर आलाच नाही. लोकसंवादात अकोला वेटींगवरच राहिला.
अकोला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील जालना, पालघर, अहमदनगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, जळगाव, यवतमाळ आदी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी आज लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. यावेळी अकोल्याचे शेतकरी संवादासाठी सकाळी ११ वाजतापासून उपस्थित होते; मात्र त्यांचा नंबर आलाच नाही. लोकसंवादात अकोला वेटींगवरच राहिला. यावेळी शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री, शास्त्रकर आदी उपस्थित होते.
लोकसंवाद कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्ही.सी. सभागृहात जिल्ह्यातील विविध कृषी योजनांचा लाभ घेतलेले प्रवीण दांदळे, खिरपुरी, ता. बाळापूर, वर्षा केशवराव ठाकरे, कान्हेरी सरप, ता. बार्शीटाकळी, विनोद भटकर, पाटखेड, ता. बार्शीटाकळी, उमेश रमेश फुलारी, पातूर, शंकर लहामगे, आलेगाव, ता. पातूर, पुरुषोत्तम दिनकर चतरकर, कापशी रोड, ता. अकोला, महेंद्र धर्मा चक्रनारायण, अकोला, महेंद्र अरुणराव काळे, सांगळूद, ता. अकोला, भीमराव सदाशिव, यावलखेड, ता. अकोला, प्रवीण पंजाबराव खोत, समशेरपूर, ता. मूर्तिजापूर, विठ्ठल आनंदराव वाकोडे, जामडी खु., ता. मूर्तिजापूर, सतीश अशोक बोंद्रे, शिवापूर, नेव्हरी, ता. अकोट, सत्यनारायण गोविंदराव म्हसाये, वारखेड, ता. तेल्हारा, दिनेश श्रीराम देवकर, तळेगाव खु. ता. तेल्हारा आदी लाभार्थी उपस्थित होते. सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी व्हिसी सुरू झाली. दुपारी २.३० वाजता व्हिसी संपली; मात्र या संपूर्ण कालावधीत अनेक जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधण्यातच वेळ गेल्यामुळे अकोल्यातील शेतकºयांचा नंबर लागलाच नाही. वेळेची मर्यादा लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त करीत एकत्रित संवाद साधणेच उचित समजले. मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, तसेच शेती परवडेल आणि शेतकरी जगेल, म्हणून २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं ध्येय निश्चित आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातली १६,००० गावं जलपरिपूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे ३४ लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर पीक उत्पादनामध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळं तर महाराष्ट्राचा कायापालट होऊ घातला आहे. धरणातला गाळ काढून शेतात टाकल्यानं पीक उत्पन्नासाठी कमालीचा फायदा होत आहे, असे स्पष्ट केले.