अकोल्याच्या पालकमंत्र्यांनी घेतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनता दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 05:56 PM2018-01-08T17:56:25+5:302018-01-08T18:31:07+5:30
अकोला: शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता आरोग्य दरबारचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला: शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य सेवा विषयक अडचणी तातडीने सोडवण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांनी सजग राहावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथे केली. शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता आरोग्य दरबारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड आणि अभ्यांगत समितीची सदस्य यावेळी उपस्थित होते.
जनता दरबार सुरु होण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी आरोग्य विभाग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, उपचाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांच्या असणाºया अडचणी सोडविण्यासाठी आता महिन्यातून दोन वेळा जनता आरोग्य दरबार भरवला जाईल. तसेच शासकीय रुग्णालयांतील कामांमध्ये एक सुसूत्रता यावी व रुग्णालयांना भेडसावणाºया अडचणींचे निराकरण करण्यासाठी नियमितपणे आढावा बैठकाही घेतल्या जातील. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्यमध्ये रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्याकरीता तेथील डॉक्टर व कर्मचाºयांची उपस्थितीत नियमितपणे तपासण्यासाठी हे केंद्र जिल्हा आरोग्य कार्यालयाशी संलग्न करण्यात येतील. रुग्णालयांना वेळेवर औषधीसह इतर मुलभूत व पायाभूत सुविधा मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून प्रस्ताव मागविण्यात आला असून त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री पुढे म्हणाले.
आरोग्य सुविधांसाठी देवस्थानांकडे निधीची मागणी करणार
महत्वाच्या आरोग्य सुविधांसाठी शिर्डी सारख्या मोठ्या देवस्थानांकडे निधीची मागणी करण्यात येईल. आरोग्य विभागातील रिक्त पदे थेट मुलाखतीव्दारे भरण्याबाबत संबंधित अधिकाºयांना सूचित करण्यात आले आहे. सध्या अकोला येथील शासकीय रुग्णालयाच्या परिसरात मोठया प्रमाणात इमारतींचे काम सुरु असून लवकरच रुग्णांसाठी नवीन वार्ड उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या अद्ययावत सुविधाही उपलब्ध होतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जनता दरबारात केवळ आठ तक्रारी
झालेल्या पहिल्या जनता आरोग्य दरबारात केवळ आठ तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारींची दखल घेऊन त्याचे निरसन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाºयां केल्या.