कॅन्सरविरोधी लढ्यात अकोल्याचे हॉस्पिटल महत्वाचे ठरेल - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:47 PM2018-12-03T12:47:03+5:302018-12-03T12:48:01+5:30
अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले.
अकोला : उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक कॅन्सर रुग्ण महाराष्ट्रात असून, रिलायन्सने कॅन्सरविरोधी उभारलेल्या लढा कौतुकास्पद आहे. जगातील सर्वात आधूनिक असे तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहचविण्यास रिलायन्सने प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले.
रिलायन्स समुहाने येथून जवळच असलेल्या रिधोरा येथे उभारलेल्या कॅन्सर उपचार केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. रिलायन्सचे ग्रामीण भागातील हे पहिले कॅन्सर उपचार केंद्र आहे. उद्घाटन सोहळ्याला रिलायन्स हॉस्पीटलच्या चेयरपर्सन टीना अंबानी, राज्याचे वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की राज्यात कोट्यवधी लोकांच्या तपासणी करण्यात आल्या असून, त्यामध्ये १० टक्के लोकांमध्ये कॅन्सर आढळून आला. त्यांचे पुन्हा स्क्रिनिंग करण्यात आले. कॅन्सर हा सर्वाधिक जीवघेणा आजार असून, त्याला पराभूत करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखूमुळे होणार तोंडाचा कॅन्सर हा सर्वाधिक तरुणांमध्ये आढळून येतो. रिलायन्सने कॅन्सरविरोधी उभारलेला लढा कौतुकास्पद आहे. रिलायन्समुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशात कॅन्सर हॉस्पिटलचे ग्रीड तयार होत आहे. जगातील सर्वात आधूनिक असे तंत्रज्ञान रिलायन्समुळे ग्रामीण भागात पोहचले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.