कोविडमुक्तीकडे अकोल्याची वाटचाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:23 AM2021-08-20T04:23:33+5:302021-08-20T04:23:33+5:30
जून महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावल्याचे चित्र दिसून आले. जुलै महिन्यात रुग्णसंख्यावाढ लक्षणीय नियंत्रणात आली. दिवसाला ...
जून महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावल्याचे चित्र दिसून आले. जुलै महिन्यात रुग्णसंख्यावाढ लक्षणीय नियंत्रणात आली. दिवसाला पॉझिटिव्ह येणाऱ्या अहवालांची संख्या दहाच्या आत आली. तुलनेने बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे १७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी केवळ ३ रुग्णांवरच रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित १४ रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास जिल्हा लवकरच कोविडमुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२१ संदिग्ध रुग्णांवर उपचार सुरू
सद्यस्थिती पाहली, तर कोविडमुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. मात्र, अजूनही कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही. सर्वोपचार रुग्णालयात कोविडचे २१ संदिग्ध रुग्ण दाखल आहेत. आरटीपीसीआर चाचणीसाठी त्यांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
गाफील राहाल, तर कोविडविरुद्धची लढाई कशी जिंकणार?
जिल्ह्यातील कोविडची स्थिती नियंत्रणात आल्याने अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठ पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. नागरिक बाजारपेठेत गर्दी करत असून कोविड नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकजण मास्कचा वापर टाळत आहेत. लक्षणे दिसूनही चाचण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. आरोग्य विभागामार्फत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना, अकोलेकर गाफील दिसून येत आहेत, अशा परिस्थितीत कोविडविरुद्धची ही लढाई कशी जिंकणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
मागील सात महिन्यांची स्थिती...
महिना - रुग्ण - मृत्यू
जानेवारी - १,१३५ - १४
फेब्रुवारी - ४,५२७ - ३१
मार्च - ११,५५५ - ८६
एप्रिल - १२,४६० - २३६
मे - १५, ३६१ - ३७६
जून - १,१२६ - ५५
जुलै - १६९ - ०७
ऑगस्ट - ४२ - २ (१८ ऑगस्टपर्यंत)