अकोल्यातील पक्षी वैभवाची सूची तयार होणार; ईएफईसीचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:59 PM2018-11-28T12:59:01+5:302018-11-28T12:59:09+5:30

अकोला जिल्ह्यात असलेल्या जैवविविधतेचा लेखा-जोखा ठेवणे कठीण कार्य असले तरी येथील पक्षीमित्रांनी परिसरात पक्षी स्थानांना सातत्याने भेटी देऊन बहुतांश पक्ष्यांची नोंद घेतली आहे.

 Akola's list of birds will be created; EFEC's initiative | अकोल्यातील पक्षी वैभवाची सूची तयार होणार; ईएफईसीचा पुढाकार 

अकोल्यातील पक्षी वैभवाची सूची तयार होणार; ईएफईसीचा पुढाकार 

googlenewsNext

अकोला: जैवविविधतेचे महत्त्व नागरिकांना समजावे. यासाठी त्यांना जैवविविधतेची ओळख होणे गरजेचे आहे. अकोला जिल्ह्यात असलेल्या जैवविविधतेचा लेखा-जोखा ठेवणे कठीण कार्य असले तरी येथील पक्षीमित्रांनी परिसरात पक्षी स्थानांना सातत्याने भेटी देऊन बहुतांश पक्ष्यांची नोंद घेतली आहे. ईएफईसीच्या पुढाकारातून अकोल्यातील या पक्षी वैभवाची सूची लवकरच तयार होणार असल्याची माहिती ईएफईसीचे उदय वझे, वन्यजीव अभ्यासक व पक्षी निरीक्षक देवेंद्र तेलकर यांनी मंगळवारी दुपारी पत्रपरिषदेत दिली.
अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणांवर दुर्मिळ अशा पक्ष्यांचे वास्तव आहे. याशिवाय विदेशी पक्षीसुद्धा स्थलांतर करून आपल्या भागात येतात, असे सांगत, उदय वझे यांनी, ईएफईसी म्हणजेच पर्यावरण आणि वने शिक्षण केंद्र आहे. पर्यावरण, वने आणि वन्यजीव संवर्धनाचे शिक्षण देण्याचे ही संस्था काम करते. पक्षी निरीक्षकांनी परिसरातील पक्षी स्थानांना भेटी देऊन त्यांच्या नोंदी घेतात. यापूर्वी सृष्टीवैभवने पहिले प्रकाशचित्र प्रदर्शनाचे २00३ मध्ये प्रकाशन तत्कालिन जिल्हाधिकारी अनुपकुमार यांच्या हस्ते केले होते. तेव्हापासून ते आजपर्यंतच्या नोंदींमध्ये वाढ झाली असल्याने, त्याची सूची होणे गरजेचे आहे, असे वझे यांनी स्पष्ट केले. पक्षी निरीक्षक देवेंद्र तेलकर यांनी, मागील अनेक वर्षांच्या नोंदी, पक्ष्यांच्या नावांची सूची तयार करणे वैज्ञानिकदृष्ट्या गरजेचे आहे. ही पक्ष्यांची सूची मराठी भाषेत अकोल्याचे पक्षी वैभव म्हणून आणि इंग्रजी भाषेत बर्डस् इन अकोला नावाने लवकरच तयार होणार आहे. पक्षीमित्रांनी या सूचीमध्ये समावेश न केलेल्या पक्ष्यांची नोंद करण्यासाठी सहकार्य करावे. त्यांच्या सहकार्यामुळे ही सूची परिपूर्ण होईल, असे सांगत, तेलकर यांनी, ही पक्षी सूची तयार झाल्यानंतर ती अकोल्यातील एक हजाराहून अधिक शाळांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल; तसेच अकोल्यातील पक्षीमित्रांची सूचीसुद्धा यात असेल. या उपक्रमात वन विभाग, वन्यजीव विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाचा सहभाग आहे. ही सूची बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधावा, असे देवेंद्र तेलकर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला डॉ. विनय पिंपरकर, अ‍ॅड. आर.एम. मोदी, अकोला-बुलडाणा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद मानकर, सदस्य सूचित देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

 

Web Title:  Akola's list of birds will be created; EFEC's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.