अकोल्याच्या मश्रुवाला कुटुंबीयांशी जुळलाय महात्मा गांधींचा स्नेहबंध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:02 PM2019-10-02T12:02:46+5:302019-10-02T12:03:32+5:30
मश्रुवाला कुटुंबीयांचे बापूजी व्याही होते आणि तोच स्नेहबंध गांधी-मश्रुवाला कुटुंबीयांनी अद्यापही जोपासला आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: अकोला हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिले आहे. अकोल्याच्या मातीशी अनेक मातब्बर नेत्यांची नाळ जुळली आहे. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक, राजगुरू, सुखदेव यांचेही या शहराशी एक नाते आहे. त्याप्रमाणे महात्मा गांधी यांचासुद्धा अकोला शहराशी स्नेहबंध जुळलेला आहे. बापूजींचे नाते केवळ भावनिक नव्हे, तर रक्ताने जुळलेले आहे. येथील मश्रुवाला कुटुंबीयांचे बापूजी व्याही होते आणि तोच स्नेहबंध गांधी-मश्रुवाला कुटुंबीयांनी अद्यापही जोपासला आहे.
त्या काळी येथील मश्रुवाला कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. किशोरलाल मश्रुवाला यांचे महात्मा गांधी व कुटुंबीयांसोबत जुळलेले होते. पुढे गांधी परिवारासोबत मश्रुवाला कुटुंबीयांशी कायमचा ऋणानुबंध जुळला. महात्मा गांधी यांचे दुसरे चिरंजीव मणिलाल यांच्यासोबत कनूभाई मश्रुवाला यांची बहीण सुशीलाबेन यांचा ६ जून १९२७ रोजी विवाह झाला होता. अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या या विवाह सोहळ्यात महात्मा गांधीसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर त्यांचा अकोल्याशी कायमच स्नेहबंध जुळला. वºहाडात आल्यावर महात्मा गांधी आवर्जुन मश्रुवाला कुटुंबीयांच्या भेटीला येत असत. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन नानाभाई, त्यांचे सुपुत्र कनूभाई, किशोरलाल, शांतिलाल हे व्यवसायासोबतच महात्मा गांधींच्या विचारानुसार स्वातंत्र्यलढ्यात योगदान देत होते. एवढेच नाही, तर मश्रुवाला कुटुंबातील ताराबेन यांनी अकोल्यात त्या काळी पिकेटीन नावाने आंदोलन सुरू करून दारूच्या दुकानांविरुद्ध हल्लाबोल सुरू केला होता. पुढे त्यांनी १९४६ मध्ये अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अशा माधान येथे आश्रम सुरू केला होता. गांधी कुटुंबीयांसोबत मश्रुवाला नातेसंबंधाने एकमेकांत गुंतले होते. महात्मा गांधी यांची नात मनुबेन हिचा विवाहसुद्धा मश्रुवाला कुटुंबात झाला होता. त्यामुळे गांधी कुटुंबीयांचा अकोल्याचा कायमच स्नेहबंध राहिला आहे. महात्मा गांधी यांचा सहवास लाभलेले कनूभार्इंकडे गांधीजींशी जुळलेल्या अनेक आठवणी आहेत. त्यांचे पुतणे प्रियदर्शी कांतिलाल मश्रुवाला यांनी बापूजींच्या काही आठवणी, नातेसंबंधांना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला. अकोल्याशी गांधी कुटुंबाचे असलेले स्नेहबंध, आठवणी खरोखरच एक अनमोल ठेवा आहेत.
सुशीलाबेन यांनी दक्षिण आफ्रिकेत केले कार्य
महात्मा गांधी यांच्या स्नूषा सुशीलाबेन या लग्नानंतर दक्षिण आफ्रिकेत गेल्या. या ठिकाणी त्यांनी पती मणिलाल गांधी यांच्यासोबत काम केले. वर्णभेदाविरुद्ध त्यांनीही आवाज उठविला. त्यानंतर भारतात परत आल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.
महात्मा गांधी यांचे सुपुत्र मणिलाल यांचा माझी आत्या सुशीलाबेन यांच्यासोबत विवाह झाला होता. तेव्हापासून ते आजतागायत गांधी कुटुंबाशी आमचा स्नेहबंध आहे. महात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी आमच्या कुटुंबाशी जुळलेल्या आहेत. गांधी कुटुंबीयांशी नाते, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
-प्रियदर्शी मश्रुवाला, कनूभाई यांचे पुतणे.