अकोल्याचा पारा ४२.६ अंशावर : उष्माघाताचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 02:19 PM2019-04-08T14:19:14+5:302019-04-08T14:19:46+5:30
अकोला: जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढला आहे.
अकोला: जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे उन्हात घराबाहेर निघणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
गत आठवड्यापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून, उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. रविवारी जिल्ह्याच्या तापमानाची नोंद ४२.६ अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्यावर दिसू लागला असून, अनेकांना डिहायड्रेशनच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. ही परिस्थिती आरोग्यासाठी घातक असून, उष्माघाताचा धोकाही नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी उन्हापासून स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. विशेषत: या दिवसात शरीराचे तापमान कायम राखण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, असा सल्लादेखील डॉक्टरांनी दिला आहे. गरज असली तरच घराबाहेर पडावे, अन्यथा उन्हात फिरणे टाळावे. शिवाय सुदृढ आरोग्यासाठी या दिवसात संतुलित आहार घेण्याचे आवाहनदेखील डॉक्टरांनी केले आहे.
गारेगार पाणी टाळा
उन्हाळ््याच्या दिवसात बहुतांश लोक गारेगार पाणी प्यायला पसंती देतात; परंतु हे गारेगार पाणी आरोग्यासाठी घातकदेखील ठरू शकते. थंड पाणी पिल्यास घसा कोरडा पडतो. त्यामुळे तहान भागत नाही. म्हणून उन्हाळ््याच्या दिवसात गारेगार पाण्या ऐवजी माठातील पाणी प्यावे.
किडनी स्टोनच्या रुग्णांनी भरपूर पाणी प्यावे.
किडनी स्टोनची समस्या असणाऱ्यांनी नेहमीच भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो; परंतु उन्हाळ््याच्या दिवसात अशा रुग्णांनी पाणी पिण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तहान नसतानादेखील भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
हे करा......!
- भरपूर पाणी प्या
- व्यायाम सकाळी किंवा सूर्यास्तानंतरच करा
- सैल वस्त्र परिधान करा
- गडद रंगाचे वस्त्र टाळा
- शिळे अन्न खाण्यास टाळा
- उन्हात जड कामे टाळा
- संतुलित आहार घ्या
उन्हाळ््यात शरीराचे तापमान संतुलित राखण्याची खरी गरज असते. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे. शिवाय, व्यायाम करणाऱ्यांनी किंवा खेळाडूंनी साधे पाणी न पिता पाण्यात चिमूटभर मीठ घेऊन प्यावे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला