अरे बापरे...! अकोल्याचा पारा ४२.८ अंशावर; उकाड्याने अकोलेकर हैराण
By रवी दामोदर | Published: April 18, 2023 07:20 PM2023-04-18T19:20:45+5:302023-04-18T19:23:58+5:30
पाऱ्याचा आलेख दिवसेंदिवस वाढताच असल्याने अकोलेकरांची होरपळ होत आहे. दिवसभर उकाड्याने अकोलेकर हैराण झाले आहेत.
अकोला : आता सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, मंगळवारी (दि. १८) अकोला शहराचे तापमान ४२.८ अंशांवर पोहोचले. पाऱ्याचा आलेख दिवसेंदिवस वाढताच असल्याने अकोलेकरांची होरपळ होत आहे. दिवसभर उकाड्याने अकोलेकर हैराण झाले आहेत. दुसरीकडे, अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच असल्याने आगामी पाच दिवस पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.
अकोला शहर कडक उन्हासाठी जगभरात प्रसिद्ध असून, दरवर्षी ऊन नवा उच्चांकावर पोहोचत आहे. त्याचाच प्रत्यय गत दोन-चार दिवसांपासून येत आहे. गत चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्याचे तापमान सातत्याने वाढत असून, पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. मंगळवारी अकोला शहरातील तापमान ४२.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे तापमान विदर्भातून अव्वल होते. आगामी दिवसात पुन्हा अवकाळीची शक्यता आहे. परंतु, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची ही लाट अशीच कायम राहून पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बाजारपेठा सामसूम, रस्त्यावरही वाहतूक नाही
उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक दुपारी १२ वाजल्यानंतर बाहेर पडेनासे झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे या कालावधीत रस्ते व बाजारपेठा निर्मनुष्य होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
बुधवारपासून तीन दिवस पुन्हा ‘अवकाळी’चे!
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात दि. १९ एप्रिलपासून तीन दिवस वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतानाही पुन्हा अवकाळीची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.