अकोल्याचा प्रणीत मावळे झाला संगीतकार! हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत गुंजायला लागले संगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:57 AM2018-01-29T04:57:03+5:302018-01-29T04:57:25+5:30
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांच्या सान्निध्यात ‘ग्रँड पियानो’चे धडे गिरविणाºया अकोल्याच्या प्रणीत मावळे या २५ वर्षीय कलाकाराचे संगीत हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत गुंजायला लागले आहे.
- राम देशपांडे
अकोला : सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांच्या सान्निध्यात ‘ग्रँड पियानो’चे धडे गिरविणाºया अकोल्याच्या प्रणीत मावळे या २५ वर्षीय कलाकाराचे संगीत हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत गुंजायला लागले आहे.
कारमेल शाळेचा विद्यार्थी असलेल्या प्रणीतने पहिल्या वर्गात संगीत स्पर्धेत पियानो वाजवून सुवर्णपदक पटकावले आणि त्याच सुवर्णपदकाने त्याला संगीत क्षेत्राची भुरळ घातली. त्याने येथील संगीत शिक्षक संजय वेलंकीवार यांच्याकडे प्राथमिक शिक्षण घेतले. नेटमधून माहिती घेऊन चेन्नई येथील संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांच्या ‘के. एम. कॉलेज आॅफ म्युझिक अॅण्ड टेक्नॉलॉजी’मध्ये प्रवेश मिळविला. यासाठी त्याला कुटुंबीयांचादेखील विरोध पत्करावा लागला.
वेस्टर्न क्लासिकल संगीताची आवड असल्याने, संगीत क्षेत्रात पदव्युत्तर पदवी मिळवित त्याने ग्रँड पियानो वाजविण्याची रशियन कला अवगत केली. यासाठी त्याला डॉ. ए. आर. रहमान व डॉ. सुरोजित चॅटर्जी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. चेन्नईतील शिक्षण पूर्ण होताच त्याने मुंबई गाठली. भल्याभल्यांना भुरळ घालणाºया मुंबई चित्रपट सृष्टीने प्रणीतलासुद्धा वास्तवाचे दर्शन घडविले; पण न खचता, न डगमगता त्याने संधीचे सोने केले. त्यानंतर प्रणीतने ए. आर. रहमान, जावेद अली, कल्याणजी-आनंदजी, तलत अजीज, जॉली मुखर्जी, बप्पी लहरी, हरीश सगणे, खामोश शहा अशा अनेक दिग्गजांसोबत साथसंगत केली.