अकोल्याच्या नासरी चव्हाणने स्वित्झर्लंडमधील परिषदेत केले भारताचे प्रतिनिधित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 02:03 PM2020-02-09T14:03:22+5:302020-02-09T14:03:31+5:30
६ फेब्रुवारीला या परिषदेत नासरीने आंतरराष्ट्रीय मंचावर अकोल्याचे नावलौकिक केले.
- नीलिमा शिंगणे-जगड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील बराचसा भाग सातपुड्याच्या पर्वतरांगांनी व्यापलेला. येथील आदिवासींचे जीवन, शेती पद्धतीही त्यांच्या संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या; मात्र अलीकडेया भागातील शेती आणि शेती पद्धती आधुनिकतेकडे वळली. हे सकारात्मक बदल एका युवतीने घडवून आणले. नासरी शेकड्या चव्हाण, असे या आदिवासी तरुणीचे नाव. नासरीने स्वित्झर्लंडमधील डोनार्च येथे जागतिक बायोडायनामिक शेती आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. ५ ते ७ फेब्रुवारी रोजी परिषद पार पडली. ६ फेब्रुवारीला या परिषदेत नासरीने आंतरराष्ट्रीय मंचावर अकोल्याचे नावलौकिक केले.
तेल्हारा तालुक्यातील बोरव्हा शंभर टक्के आदिवासी असलेले गाव. आधुनिक शेती पद्धतीचा मागमूसही गावात नव्हता; मात्र अलीकडे कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत सर्ग विकास समितीच्या एका शेतीशाळेने गावात परिवर्तनाचे बीज रोवले. गावात कंपोस्ट खत, एस. ९ कल्चर आणि सेंद्रिय कीटकनाशक असणाºया तरल खादची निर्मिती सुरू झाली. गावाला या नव्या बदलाला सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांच्यातीलच एक युवती नासरी चव्हाण.. सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणाºया गोष्टी बारकाईने समजून घेतल्या. त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही तिने घेतले. आदिवासींसाठी नव्या बदलांसाठी मोठा अडसर म्हणजे भाषा. येथील आदिवासींची मातृभाषा ही कोरकू. हिंदीचेही ज्ञान नसल्यासारखेच. त्यामुळे शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना नवीन तंत्रज्ञान आणि प्रयोगाचे धडे कसे द्यावे, हा प्रश्न होता; मात्र नासरी या प्रश्नाचे उत्तर होती. तिने गावाला कमी खर्चाच्या शेतीचे महत्त्व सांगायला सुरुवात केली.आज या गावात प्रत्येक घरासमोर कंपोस्ट खत निर्मितीचे ढीग शेणामातीने व्यवस्थित लिपलेले दिसतात.सध्या गावातील शेतकºयांच्या रासायनिक खते आणि कीटकनाशकावर होणारा खर्च ९० टक्क्याने कमी झाल्याने शेतकºयांचे जीवनमान उंचावले.
अनेक पुरस्कारांची मानकरी
नासरीने स्वत:च शिकवायला प्रारंभ केला. स्वत:देखील इंग्रजी बोलणे आणि लिहायला शिकली. तिचा हा संपूर्ण प्रवास सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणला होता. यानंतर अनेक पुरस्कारांची मानकरी नासरी ठरली. केनियातील शेतकरी आणि तज्ज्ञांनीदेखील तिला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या देशात आमंत्रित केले होते. नासरीने दोन दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले.