अकोल्याचा ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न पोहोचला राज्यभरात!
By atul.jaiswal | Published: September 5, 2018 03:35 PM2018-09-05T15:35:05+5:302018-09-05T15:59:26+5:30
एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न आरोग्य विभागामार्फत १ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून, पहिल्या तीन महिन्यांतच १ लाख २० हजार झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यात आली आहेत.
- अतुल जयस्वाल
अकोला : तामिळनाडू राज्यातील सामाजिक कार्यकर्ता तथा भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए. एस. नाथन यांनी अकोला जिल्ह्यात २०१७ मध्ये सुरू केलेला ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न आरोग्य विभागामार्फत १ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून, पहिल्या तीन महिन्यांतच १ लाख २० हजार झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यात आली आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यात सर्वाधिक २२ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले.
‘एक जन्म-एक वृक्ष’ मोहिमेची अंमलबजावणी आशा स्वयंसेविकांमार्फत संपूर्ण राज्यात जून २०१८ पासून करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक सतीश पवार यांनी १४ मे रोजी दिल्या होत्या. तेव्हापासून राज्यभरात ही मोहीम फोफावली आहे. या मोहिमेंतर्गत ज्या कुटुंबात नवजात बालकांचा जन्म होईल, त्या कुटुंबाच्यावतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते. या वृक्षाचे जतन करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका त्या कुटुंबास प्रोत्साहित करीत असून, या प्रयोगामुळे वृक्ष लागवडीस मदत होत आहे. यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वात गट प्रवर्तक व आरोग्य विभागातील कर्मचारी प्रयत्नरत आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत १ जून ते ३१ आॅगस्ट या कालावधीत १ लाख २० हजार झाडांचे रोपण करण्यात आल्याचा दावा ए. एस. नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
समन्वयासाठी व्हॉट्स अॅप ग्रुप
या मोहिमेच्या समन्वयासाठी नाथन यांनी ‘एक जन्म-एक वृक्ष’ नावाचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला असून, या ग्रुपवर माहितीचे आदान-प्रदान केले जाते. राज्यभरातील समन्वयक या ग्रुपवर वृक्षारोपणाचे छायाचित्र व आकडेवारीची माहिती टाकतात.
आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची
या मोहिमेत गावपातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची आहे. आशा स्वयंसेविका ज्या घरात बालकाचा जन्म झाला आहे, अशा घरांना भेटी देऊन त्यांना वृक्षारोपणासाठी प्रवृत्त करतात.
राज्यभरात लागू झाल्यापासून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी स्वत: अकोल्यासह १२ जिल्ह्यांमध्ये जाऊन मोहिमेबाबत मार्गदर्शन केले आहे. आतापर्यंत १ लाख २० हजार झाडे लावण्यात आल्याची आकडेवारी उपलब्ध आहे.
- ए. एस. नाथन, संस्थापक, भारत वृक्ष क्रांती मोहीम, अकोला.