‘जेईई मेन्स’ परीक्षेत अकोल्याचा टक्का वाढतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:25 PM2019-05-03T12:25:57+5:302019-05-03T12:26:04+5:30
अकोला: अकोल्यातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्य आणि वैद्यकीयसोबतच अभियांत्रिकी क्षेत्राकडे कल वाढत असल्यामुळे अकोल्याचा ‘जेईई मेन्स’ परीक्षेत टक्का वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
अकोला: अकोल्यातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्य आणि वैद्यकीयसोबतच अभियांत्रिकी क्षेत्राकडे कल वाढत असल्यामुळे अकोल्याचा ‘जेईई मेन्स’ परीक्षेत टक्का वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जेईई मेन्स परीक्षेमध्ये यंदा अकोल्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कटआॅफदेखील वाढला आहे. तन्मय मांडवेकर या विद्यार्थ्याने जेईई मेन्स परीक्षेत देशातून १७ वा क्रमांक प्राप्त केला. यासोबतच अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त केल्यामुळे ते जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यंदा जेईई मेन्स परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लागला. अकोल्यातील ४५0 च्यावर विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. जेईई मेन्स परीक्षा ही सर्व नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीच्या प्रवेशासाठी, तसेच जेईई अॅडव्हान्स म्हणजे आयआयटीच्या प्रवेश परीक्षेच्या पात्रतेसाठी ही परीक्षा महत्त्वाची असते. गतवर्षीपासून ही परीक्षा दोन्ही पद्धतीने घेतल्या गेली. पेन-पेपर आणि आॅनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पर्सेटाइलने विद्यार्थी निवडले जातात. वैद्यकीय क्षेत्रासोबतच अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्यामुळे विद्यार्थी जेईई परीक्षेवर लक्ष केंद्रित करीत आहेत. ही परीक्षा दिल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी मोठी कसरत करावी लागते. कारण ही परीक्षा कठीण असल्यामुळे पात्र ठरलेल्या ४00-५00 विद्यार्थ्यांपैकी जवळपास ४0 विद्यार्थी यात यशस्वी होतात. असे असले तरीही अकोल्यातील विद्यार्थ्यांची जेईई मेन्स परीक्षेतील टक्केवारी वाढत असल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे.
जेईई मेन्स परीक्षेचा टक्का वाढत असला, तरी अॅडव्हान्स परीक्षेचा टक्का वाढत नाही. अॅडव्हान्स परीक्षेसाठी आठवी, नववीपासूनच अभ्यास करावा लागतो; परंतु जेईई मेन्स परीक्षेचा वाढत असलेला टक्का ही मोठी उपलब्धी आहे. अकोल्यात शैक्षणिक दृष्टिकोनातून चांगले वातावरण आहे. नीट, जेईई मेन्ससाठी उत्कृष्ट एज्युकेशन हब म्हणून अकोला पुढे येत आहे.
-प्रा. अजय देशपांडे
वैद्यकीयसोबतच अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्यामुळे जेईई मेन्सच्या निकालात वाढ झाली आहे. ही बाब अकोल्यासाठी निश्चितच समाधानाची आहे; परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी यात माघारतो. अकोला विभागात जेईईबाबत पालक व विद्यार्थी जागरूक आहेत. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात चांगले भविष्य आहे.
-प्रा. ललित काळपांडे
अॅडव्हान्ससाठी करावी लागते कसरत: वैद्यकीयसोबतच अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल
‘जेईई मेन्स’ परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थी भरारी घेत आहेत. दोन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली संधी प्राप्त झाली. गतवर्षीच्या तुलनेत माझ्याकडील यंदा ९४ विद्यार्थ्यांची अॅडव्हान्स परीक्षेसाठी निवड झाली. १५0 च्यावर विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ही समाधानकारक बाब आहे.
-प्रा. मुकुंद पाध्ये
‘जेईई’च्या दोन परीक्षांचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. त्यामुळे अकोल्यातील विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ झाली; परंतु अॅडव्हान्ससाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. चांगले गुण मिळाले तर चांगले कॉलेज मिळते. दिवसेंदिवस जेईई निकालाचा टक्का वाढत आहे. याचे समाधान आहे.
-प्रा. प्रशांत देशमुख