अकोल्याचे तापमान ४०.७ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:15 AM2021-05-28T04:15:17+5:302021-05-28T04:15:17+5:30
अकोला : चक्रीवादळ व ढगाळ वातावरणाचा परिणाम तापमानावर दिसत आहे. जिल्ह्यातील तापमानात सतत चढ-उतार होत असून गुरुवारी ४०.७ अंश ...
अकोला : चक्रीवादळ व ढगाळ वातावरणाचा परिणाम तापमानावर दिसत आहे. जिल्ह्यातील तापमानात सतत चढ-उतार होत असून गुरुवारी ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील दोन दिवसांत तापमानात घसरण झाली आहे.
पेरणी हंगाम जवळ असल्याने कामांना गती
अकोला : कोरोना साथीमुळे शासकीय कार्यालयांत उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा असल्या तरी अत्यावश्यक सेवा पुरविणारी कार्यालये सुरू आहेत. कृषी कार्यालयांकडून आवश्यक तिथे प्रत्यक्ष हजर राहून व शक्य तिथे ऑनलाइन कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. पेरणी हंगाम जवळ असल्यामुळे कामांना गती देण्यात आली आहे.
रोजगारासाठी भटकंती
अकोला : युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून दिली; मात्र, मोठ्या उद्योगांचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.
शेतीत यंत्राचा वापर वाढला
अकोला : शेती मशागतीसाठी मशनरी व ट्रॅक्टर यंत्राचा उपयोग होत आहे. आधुनिक युगात नांगरणी व वखरणी बैलाऐवजी ट्रॅक्टरने होत असल्याने शेतीत यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही प्रमाणात मशागतही सोयीस्कर झाली आहे.
जनावरांचा चाराप्रश्न
अकोला : जंगलात चारा नाही. घरी साठवलेलाही संपला, त्यामुळे पशुधन पालकांपुढे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षी सोयाबीन खराब झाल्याने ही समस्या गंभीर झाली. विकतचा चाराही महाग आहे.
भारनियमन बंद तरीही विजेचा लपंडाव
अकोला : जिल्हा भारनियमनमुक्त असला तरीही वेळी-अवेळी बत्ती गुल होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा वा रात्री कधीही वीजपुरवठा खंडित होत आहे.
ग्रामीण भागात वृक्षतोड जोमात
अकोला : वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने ग्रामीण तथा शहरी भाग वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे. इंधन उपलब्ध नसल्याने सरपणाकरिता तसेच बऱ्याच गावांतील शेतकऱ्यांची शेतजमीन धरणांतर्गत बाधित झाल्याने वृक्षतोड जोमात सुरू आहे.
दिव्यांग महिलांकरिता आरोग्य कार्यशाळेचे आयोजन
अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन, रेडिओ व्हिजन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष व शिवाजी महाविद्यालय साहायक प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्याविषयी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच श्रृंखलेत ‘मासिक पाळी दिना’निमित्त दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या जागतिक मंचावर फेसबुक लाइव्हद्वारा २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. मंजुश्री जांभरुणकर यांची आरोग्य विषयक विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे.