सीए फायनल परीक्षेत अकोल्याचे दोघे राष्ट्रीय स्तरावर चमकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:56 AM2020-01-17T10:56:06+5:302020-01-17T10:56:12+5:30
क्रिष्णा प्रफुल्ल चरखर याने ५१९ गुण घेत, देशातून ३४ वा क्रमांक तर अतुल प्रफुल्ल अग्रवाल याने ५0६ गुण घेत, ४६ वा क्रमांक पटकावला आहे.
अकोला: इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएआय) च्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये राठी करियर फोरम (आरसीएफ)च्या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवून अकोला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सोबतच अकोल्यातील ३0 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सीए-फायनल परीक्षा उत्तीर्ण करीत सीएची पदवी प्राप्त केली आहे. क्रिष्णा प्रफुल्ल चरखर याने ५१९ गुण घेत, देशातून ३४ वा क्रमांक तर अतुल प्रफुल्ल अग्रवाल याने ५0६ गुण घेत, ४६ वा क्रमांक पटकावला आहे.
आयसीएआयने शुक्रवारी सीए-फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला. या निकालामध्ये अकोल्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. क्रिष्णा चरखर याने ३४ वा क्रमांक आणि अतुल अग्रवाल याने ४६ वा क्रमांक पटकावत, देशपातळीवर अकोल्याचे नाव उंचावले आहे. अतुल अग्रवाल हा सीए-आयपीसीसीमध्येसुद्धा आॅल इंडिया मेरिट आला होता, तर क्रिष्णा चरखर याचे मेरिट केवळ तीन गुणांनी हुकले होते; परंतु त्याने सीए फायनल परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. दोन्ही विद्यार्थ्यांनी आठ विषयांपैकी ७ विषयांत प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली आहे. यासोबतच जयेश माधवाणी, श्यामल चांडक, पायल नागवाणी, राधिका चितलांगे, योगिता अग्रवाल, मयूर जाडिया, कोमल चांडक, अनुज अग्रवाल, स्नेहल टावरी, ज्योती अग्रवाल, मयूरी मानधने, शुभम मानधने, शुभम मुंदडा, प्रतीक्षा चांडक, पूजा मनवाणी, मयूर जैन, उमंग चांडक, पीयूष राठी, राधिका मुंदडा, मयूर राऊत, अभिषेक व्यास, अनुप शर्मा, अक्षय लाहोटी, श्रुती खोवाल, करण तोष्णीवाल, रश्मीतकुमार, पूजा झाडे आदी विद्यार्थ्यांनी सीए फायनल परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांना आरसीएफचे संचालक सीए नीरज राठी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा. राठी यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक केले. (प्रतिनिधी)