अकोल्याच्या वैदिशाचे नाव ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:09+5:302021-05-18T04:20:09+5:30
अकोला : शहरातील मोठी उमरी येथील रहिवासी तसेच चंद्रपूर बँक ऑफ इंडिया पद्मापूर शाखेत कार्यरत अधिकारी वैभव ज्ञानेश्वर ...
अकोला : शहरातील मोठी उमरी येथील रहिवासी तसेच चंद्रपूर बँक ऑफ इंडिया पद्मापूर शाखेत कार्यरत अधिकारी वैभव ज्ञानेश्वर शेरेकर व दीपाली वैभव शेरेकर यांची कन्या वैदिशा वैभव शेरेकर या अडीच वर्षांच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळविले असून, अकोल्याची मान जागतिक स्तरावर अभिमानाने उंचावली आहे. वैदिशाचे वय अडीच वर्ष असून, ती २०० पेक्षा अधिक देशांची राजधानी व राष्ट्रध्वज अचूकपणे सांगते. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वैभव ज्ञानेश्वर शेरेकर व दीपाली वैभव शेरेकर यांची वैदिशा ही एकुलती एक मुलगी आहे. अवघ्या दीड वर्षाची असताना तिच्या तल्लख बुद्धिमत्तेची जाणीव तिच्या आई-वडिलांना झाली. सुरुवातीला तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी फळे, फुले, पक्षी, प्राणी व भाज्यांचे चार्ट आणले. तिला ओळख करून दिली. त्यानंतर वैदिशाने ते अचूक सांगितले. त्यानंतर तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी व देशांचे राष्ट्रीय ध्वज असलेले चार्ट आणून शिकवण सुरू केली. वैदिशाने अवघ्या पंधरा दिवसांत २०० पेक्षा अधिक देशांच्या राजधानी व राष्ट्रध्वज अचूकपणे सांगितले. याची दखल जानेवारी महिन्यातच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती. आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने तिचे इतक्या लहान वयात केलेल्या असाधारण कामगिरीस पाहून तिचे नाव इंटरनॅशनल बुक रेकॉर्डमध्ये नोंदवून तिचा जागतिक स्तरावर गौरव केला आहे. सध्या वैदिशा ही तिचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे धेय लवकरच गाठणार असून, त्यासाठी ती सराव करीत आहे. वैदिशाच्या या कामगिरीमुळे देशाची, महाराष्ट्राची आणि अकोल्याची मान जागतिक स्तरावर अभिमानाने उंचावली गेली आहे. (फोटो)