दिलासादायक : अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:09 PM2020-04-05T18:09:57+5:302020-04-05T18:12:07+5:30
आठवडाभरात ‘आयसीएमआर’ आणि ‘एनआयव्ही’ची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
अकोल: कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय नमुने तपासण्यासाठी विदर्भात केवळ एकच लॅब कार्यान्वित आहे. त्यामुळे अकोल्यातील प्रस्तावित ‘व्हीआरडीएल’ लॅबकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे; मात्र लॅबसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि रसायने उपलब्ध होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. अशातच आठवडाभरात अकोल्यातील लॅब सुरू होण्याची शक्यता असल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. विदर्भात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची चाचणी जलद गतीने होणे गरजेचे झाले आहे.
नागपूर, यवतमाळपाठोपाठ बुलडाणा, वाशिम आणि अमरावती येथेही कोरोनाचे रुग्ण आढळले असून, दररोज संदिग्ध रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे; परंतु तपासणीचा भार नागपूरस्थित एकमेव लॅबवर येत आहे. अशा परिस्थितीत अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब महत्त्वाची भूमिका बजावू शकते; परंतु ‘लॉकडाऊन’मुळे लॅबसाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे तसेच रसायने पुरविण्यासाठी पुरवठादारच उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येत होत्या; परंतु आवश्यक ३० ते ३५ प्रकारच्या रसायनांपैकी बहुतांश रसायने उपलब्ध झाल्याने लॅब सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; मात्र अद्यापही काही वैद्यकीय उपकरणे मिळाली नसल्याने लॅब सुरू होण्यास दिरंगाई होऊ शकते. असे असले तरी आगामी दोन दिवसांत ही समस्याही सुटणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली असून, आठवडाभरात ही लॅब सुरू होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
पुण्यातील एका कंपनीमार्फत रसायने उपलब्ध
प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील एका कंपनीमार्फत रसायने व उपकरणे मिळाली असून, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रविवारी वाहन पाठविण्यात आल्याची माहिती आहे. ही रसायने मिळाल्यानंतर लॅब सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
लॅबच्या मान्यतेसाठी ‘आयसीएमआर’कडे करणार मागणी!
वैद्यकीय उपकरणे व रसायने उपलब्ध झाल्यानंतर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ‘आयसीएमआर’कडे लॅब सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे. त्यानंतर लगेच ‘आयसीएमआर’तर्फे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) किट पुरविण्याची सूचना दिली जाणार असून, अकोला जीएमसीत लवकरच नमुन्यांची चाचणी करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
लॅबसाठी आवश्यक रसायने उपलब्ध झाली आहेत; परंतु काही वैद्यकीय उपकरणे अद्याप मिळाली नाहीत. त्यासाठी पुण्याला वाहने पाठविली आहेत. त्यामुळे लॅब सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आठवडाभरात ‘आयसीएमआर’ आणि ‘एनआयव्ही’ची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
- डॉ. अपूर्व पावडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.