अकोल्याच्या तरुणाची ‘गुगल’ भरारी; ‘गुगल सर्च’ संमेलनात सहभाग
By atul.jaiswal | Published: June 26, 2018 03:52 PM2018-06-26T15:52:29+5:302018-06-27T16:10:12+5:30
महाराष्ट्रातील मोजक्या लेखक, प्रकाशकांचा सहभाग असलेल्या या संमेलनात केवळ मयूर खरपकर यांना बोलण्याची संधी मिळाल्याने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : इंटरनेट जगतातील सर्वाधिक वापर होणारे आणि सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन ‘गुगल’ ने गत काही वर्षांपासून भारतातील प्रादेशिक भाषांवर लक्ष केंद्रित केले असून, यासाठी ‘गुगल सर्च संमेलन’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. पुणे येथे २२ जून रोजी पार पडलेल्या या संमेलनात अकोल्यातील तरुण वेब प्रकाशक मयूर खरपकर याने सहभाग नोंदवून ‘गुगल’ने नव्याने ‘लाँच’ केलेल्या प्रादेशिक भाषा संदर्भातील ‘टूल्स’वर आपले विचार मांडून काही शिफारशींचे ‘गुगल टीम’ समोर सादरीकरण केले. महाराष्ट्रातील मोजक्या लेखक, प्रकाशकांचा सहभाग असलेल्या या संमेलनात केवळ मयूर खरपकर यांना बोलण्याची संधी मिळाल्याने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
समाजमाध्यमांमध्ये प्रादेशिक भाषांचा वाढता वापर लक्षात घेऊन गुगलने ‘गुगल सर्च संमेलन’ हा देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या भाषांतील साहित्य आणि पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवू पाहणाऱ्या प्रकाशक आणि लेखकांना मार्गदर्शन केले जात आहे. यंदा प्रथमच मराठीचा या सर्च संमेलनामध्ये समावेश करण्यात आला असून, २२ जूनला पुण्यात हे संमेलन पार पडले. या संमेलनात हिंदी, इंग्रजीसह तेलुगू, तमिळ, बंगाली आणि मराठी या चार प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या भाषांतील लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स, प्रादेशिक भाषांतील वेब डेव्हलपर्स, मराठीशी संबंधित व्यावसायिकांशी गुगल टीमने या संमेलनामध्ये संवाद साधला. गुगलच्या ‘टूल्स’चा वापर करून प्रादेशिक भाषांतील साहित्य कसे पोहोचवता येईल, याचा उहापोह या संमेलनात करण्यात आला. या संमेलनात अकोल्यातील मयूर खरपकर या तरुण प्रकाशकाने सहभाग नोंदवून, त्याने गुगलच्या प्रादेशिक भाषा संदर्भातील नव्या ‘टूल्स’बाबत आपले विचार मांडले व काही शिफारशी केल्या. यावेळी त्याने गुगल टीम व उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली.
मयूरचे ‘पोर्टल’ हिंदी भाषेतील ‘टॉप टेन’मध्ये
मयूर खरपकर हे गत काही वर्षांपासून ‘ग्यानी पंडित’ या हिंदी भाषेतील वेब पोर्टलच्या तांत्रिक बाबी सांभाळत आहेत. हिंदी भाषेतील ‘टॉप टेन’ पोर्टलमध्ये त्यांच्या ‘ग्यानी पंडित’ या पोर्टलचा समावेश असून, महिन्याकाठी ३० लाख नेटकरी या पोर्टलला भेट देत असल्याचा दावा मयूर खरपकर यांनी केला आहे.