अकोल्यात अवैध पीक संवर्धके व विद्राव्य खताचा साठा सापडला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2016 12:43 AM2016-08-10T00:43:40+5:302016-08-10T00:43:40+5:30
कृषी विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई.
अकोला, दि. 0९: : अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये अवैध पीक संवर्धके व १९:१९:१९ विद्राव्य खताचा साठा सापडला आहे. कृषी विभाग व पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली.
औद्योगिक वसाहतीत फेज ४ मध्ये वीज उपकेंद्राच्या पूर्व दिशेला रमेश सखाराम पांचगे यांचे गोदाम आहे. या गोदामात अवैध पीक संवर्धके व रासायनिक खताचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्याने कृषी विभागाचा गुण नियंत्रण विभाग व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने या गोदामावर छापा टाकला. यामध्ये १९:१९:१९ विद्राव्य खताचे १९ पॉकीट व पीकवाढीसाठी वापरण्यात येणारे पीक संवर्धके आढळली. याबाबत पथकाकडून कागदपत्राची पडताळणी करण्यात येत आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये विद्राव्य खते व पीक संवर्धके आढळली आहेत. याबाबत पडताळणी सुरू आहे. ज्यांच्याकडे हा साठा सापडला त्यांच्या गोदामपालांनी या साठय़ांचे कागदपत्र गोदामाच्या मालकाकडे असल्याची माहिती दिली आहे. गोदामाचा मालक बाहेरगावी असल्यामुळे कागदपत्र बघितल्यानंतर काय ते ठरवता येईल.
- मिलिंद जंजाळ,
कृषी गुण नियंत्रण अधिकारी,
कृषी विभाग,अकोला.