अकोलेकरांनो, सावधान; शहरात डेंग्यूसदृश आजाराची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:17 PM2019-07-03T14:17:02+5:302019-07-03T14:17:17+5:30
अकोला: पावसाळ्याच्या तोंडावर शहरात डेंग्यूसदृश आजाराने प्रवेश केला असून, नागरिकांच्या घरातच साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची पैदास होत असल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला: पावसाळ्याच्या तोंडावर शहरात डेंग्यूसदृश आजाराने प्रवेश केला असून, नागरिकांच्या घरातच साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची पैदास होत असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांचा उदासीन व दुर्लक्षित कारभार पाहता आगामी दिवसांत शहरात डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाचा वैद्यकीय आरोग्य विभाग सक्रिय झाल्याची माहिती आहे.
मागील सहा वर्षांपासून अकोलेकरांना डेंग्यूसदृश आजाराने हैराण करून सोडले आहे. पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरियाच्या आजारात वाढ होत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. उघड्यावर असो वा घरात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. ‘एडिस एजिप्तायट या डासाने चावा घेतल्यास डेंग्यूचा फैलाव होतो. डेंग्यू किंवा मलेरिया झालेले अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे अशा रुग्णांचा अचूक आकडा समोर येत नसल्याची परिस्थिती आहे. जीवघेण्या डेंग्यूचा धोका ओळखून मनपाच्या मलेरिया विभागासह वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने अकोलेकरांना घरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेल्या पाण्यांमध्ये औषध फवारणी करून पाणी वाहते करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. घरामध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्यास त्वरित मनपाच्या वैद्यकीय यंत्रणेला सूचित करण्याचे आवाहन केले आहे.
एक दिवस कोरडा पाळा!
साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यानंतर डेंग्यू, हिवताप, चिकुन गुनिया आदी साथरोगांचा फैलाव होतो. हे जीवघेणे आजार टाळण्यासाठी अकोलेकरांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याची गरज आहे. याकरिता घरातील कुलर, फ्रिज, एसी, डब्बे व कुंड्या यांची स्वच्छता करण्याची गरज असून, घरातील सर्व भांडी घासून-पुसून स्वच्छ ठेवावेत, सडके टायर, फुटके मडके, नारळाची करवंटी आदींची घंटागाडीद्वारे तातडीने विल्हेवाट लावावी.
रुग्ण डेंग्यूसदृश असला तरीही...
डेंग्यूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची दोन प्रकारे चाचणी केली जाते. ‘रॅपिड’ चाचणीचे तीन प्रकार असून, तीनपैकी कोणतीही चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यास तो रुग्ण डेंग्यूसदृश समजल्या जातो. तसेच ‘एलेन्झा’ चाचणी केली असेल तर त्या रुग्णाला डेंग्यू झाल्याचे निश्चित मानल्या जाते. ‘रॅपिड’ चाचणीद्वारे डेंग्यूसदृश रुग्ण आढळला तरीही त्याच्यावर मात्र डेंग्यूच्या रुग्णाप्रमाणेच उपचार करण्यात येतात.
घरात अळ्यांचा साठा!
गतवर्षी मनपातील काही पदाधिकारी, न्यायाधीश तसेच शहरातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली होती. वैद्यकीय आरोग्य पथकाने त्यांच्या घरांची पाहणी केली असता, माठाखाली ठेवलेल्या स्टिलच्या भांड्यात, फुलदाण्या, कुंड्या तसेच कुलरच्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय.
घरातील व्यक्तीला डेंग्यूसदृश आजार किंवा हिवतापाची लक्षणे आढळल्यास आम्हाला तातडीने सूचना द्यावी, त्या ठिकाणी पथकाद्वारे पाहणी करून उपाययोजना केल्या जातील.
-डॉ. फारूख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा.