अकोलेकर बेफिकीर; मनपाने वसूल केला ५२ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:32 AM2021-03-04T04:32:26+5:302021-03-04T04:32:26+5:30
शहरात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना अकाेलेकर बिनधास्त फिरत असल्याचे दिसत आहे. संशयित रुग्णांनी काेराेनाच्या चाचणीकडे पाठ फिरवल्यामुळे ...
शहरात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना अकाेलेकर बिनधास्त फिरत असल्याचे दिसत आहे. संशयित रुग्णांनी काेराेनाच्या चाचणीकडे पाठ फिरवल्यामुळे काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १५ फेबुवारीपासून शहरासह जिल्ह्यात जमावबंदी लागू केली. तसेच दि. २३ फेब्रुवारीपासून टाळेबंदी लागू करीत त्यामध्ये ८ मार्चपर्यंत वाढ केली आहे. काेराेनाच्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन केले जात असल्याचे पाहून महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी मास्क न लावणाऱ्या व फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविराेधात कारवाईचे निर्देश दिले होते. मंगळवारी मनपा, पाेलीस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त पाच पथकांनी १०५ बेफिकीर नागरिकांसह आठ व्यावसायिकांजवळून ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
दंड जमा करण्याच्या मानसिकतेत बदल करा !
संसर्गजन्य कोरोनाचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. प्रशासकीय यंत्रणांच्या स्तरावर नागरिकांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले जात आहे. घराबाहेर निघताना तोंडाला मास्क लावणे अनिवार्य केले असताना संयुक्त पथकांकडून दररोज किमान शंभर ते दीडशे बेजबाबदार अकोलेकरांना दंड आकारण्याची कारवाई केली जात आहे. दंडात्मक रक्कम जमा करण्याच्या मानसिकतेत अकोलेकरांनी बदल करण्याची गरज आहे. तरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
दूधविक्रेत्यांना मुभा द्यावी !
दुधाचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश होतो. दूध नाशवंत असल्यामुळे तसेच गाई-म्हशी यांच्यातून दूध काढण्याची ठराविक वेळ असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने दूध विक्रेत्यांना निर्धारित वेळेपेक्षा जास्त कालावधी निश्चित करून देण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यावसायिकांना सकाळी ९ ते रात्री ९ अशी वेळ निश्चित करून दिली आहे. शहरातील दूध डेअरी विक्रेत्यांचा विचार करून जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश लागू करावा, अशी मागणी होत आहे.