गणेशोत्सवात अकोलेकरांनी वितरित केला तीन कोटींचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:06 AM2019-09-14T11:06:26+5:302019-09-14T11:06:30+5:30
गणेशोत्सवात अकोलेकरांनी तीन कोटी रुपयांचा प्रसाद भाविक भक्तांना वितरित केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
अकोला : गत दहा दिवस चाललेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात अकोलेकरांनी तीन कोटी रुपयांचा प्रसाद भाविक भक्तांना वितरित केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गणेशोत्सवादरम्यान खोबरा, नारळ आणि शेंगदाण्याची विक्रमी विक्री झाल्याची माहिती होलसेल किराणा बाजारातील यंत्रणेने दिली आहे. विशेष म्हणजे यामध्ये खवा आणि साखर वेगळीच राहिली. ती गणना केली तर जवळपास दोन कोटींची अधिक वाढ यामध्ये होते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
गणेशोत्सवात सर्वात जास्त विक्री ही खोबरा आणि नारळची होते. त्या खालोखाल शेंगदाणे, साखर आणि खवा असतो. अकोल्यात दर महिन्याला असलेली मागणी पाहता, गणेशोत्सवाच्या कार्यकाळात दुपटीने खोबरा, नारळ आणि शेंगदाण्याची मागणी होते. खोबरा डोल आणि खोबरा तुकड्याची विक्री यंदा १५० ते १८० रुपये प्रती किलोने झाली. दर महिन्याला अकोल्यात चार गाड्या (ट्रक) खोबऱ्यांची विक्री होते; मात्र गणेशोत्सव दरम्यान नवीन किराणा बाजारातून १२ खोबरा गाड्यांची विक्री झाली. त्याची किंमत दीड कोटी रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यासोबतच भुईमूग शेंगदाण्याची मागणी यादरम्यान वाढली. ९५ ते १२० रुपये किलो असलेल्या शेंगदाण्याच्या पाच गाड्या यादरम्यान उतरल्यात. जवळपास एक कोटीचे शेंगदाणे अकोलेकरांनी वितरित करीत फस्त केले. पूजेसाठी लागणाºया नारळालादेखील मोठी मागणी राहिली. दहा गाड्या नारळाचे ट्रक अकोल्यात खाली झाले. पन्नास लाखांची उलाढाल यावर झाली. एकूण तीन कोटी रुपयांची उलाढाल केवळ खोबरा, नारळ आणि शेंगदाण्यावर झाली. साखर आणि खवा याची मोजणी केली असता, हा गणेशोत्सवाचा प्रसाद पाच कोटींच्या घरात पोहोचल्याच्या नोंदी मिळत आहेत.