अकोलेकर गाफील; ३२३ जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:45+5:302021-05-06T04:19:45+5:30

अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली आहे. तरीही या ...

Akolekar Ghafil; 323 people infected with corona | अकोलेकर गाफील; ३२३ जणांना कोरोनाची लागण

अकोलेकर गाफील; ३२३ जणांना कोरोनाची लागण

Next

अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली आहे. तरीही या परिस्थितीचे अकोलेकरांना सुतराम गांभीर्य नसल्यामुळे की काय, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. परिणामी, शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, बुधवारी ३२३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

संसर्गजन्य कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाने सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. बाजारपेठेत तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शासनाने सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत नागरिकांना परवानगी दिली आहे. दरम्यान, बाजारात साहित्य खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल लावणे अनिवार्य आहे, तसेच आपसात किमान चार ते पाच फूट अंतर राखणे अपेक्षित आहे. या सर्व नियमावलीचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सकाळी बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी जाणारे नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होत असल्याने त्याचा फैलाव मोठ्या झपाट्याने होत आहे. रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येत असून, उपचारादरम्यान अनेक जणांचा मृत्यू होत आहे. या सर्व परिस्थितीचे नागरिकांना कवडीचेही गांभीर्य नसल्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यांत वाढ होत आहे. बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार मनपा क्षेत्रातील तब्बल ३२३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाच्या लक्षणात बदल; अकोलेकरांनो काळजी घ्या!

गतवर्षी ७ एप्रिल रोजी शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला होता. त्यावेळी रुग्णांमध्ये सर्दी होणे, घसा खवखव करणे, अंगदुखी व ताप येणे, अशी लक्षणे आढळून येत होती. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली असून, यावेळी कोरोनाच्या लक्षणांत कमालीचा बदल झाल्याचे दिसत आहे. सर्दी, अंगदुखी न होता कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून सहाव्या दिवशी थेट ताप येणे, जोराचा खोकला व श्वास घ्यायला त्रास होत असल्याची लक्षणे आहेत, तसेच पातळ संडास होऊन हातपाय गळून जात असल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title: Akolekar Ghafil; 323 people infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.