ऑक्टोबर हिटने अकोलेकर त्रस्त, पारा ३५ अंशांवर

By Atul.jaiswal | Published: October 5, 2023 02:02 PM2023-10-05T14:02:06+5:302023-10-05T14:02:44+5:30

उन्हाची तीव्रता वाढली : उकाड्याने नागरिक हैराण

Akolekar hit by October heat, mercury at 35 degrees | ऑक्टोबर हिटने अकोलेकर त्रस्त, पारा ३५ अंशांवर

ऑक्टोबर हिटने अकोलेकर त्रस्त, पारा ३५ अंशांवर

googlenewsNext

अकोला : पावसाने काढता पाय घेताच जिल्ह्यात सूर्याची प्रखरता वाढल्याने उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पारा ३५ अंशांवर गेल्यामुळे अकोलेकरांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागत आहे. मान्सून अधिकृतरीत्या १० ऑक्टोबरनंतर राज्यातून परतणार आहे. यावर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस फारसा झाला नसल्याने आता हवामान बहुतांश कोरडे झाले असून, तापमानाचा पारा वाढला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पारा ३४ अंशांपर्यंत कायम असल्याने अकोलेकरांना ‘ऑक्टोबर हिट’ने चांगलेच ग्रासल्याचे चित्र आहे.

गुरूवारी शहराचा पारा ३५.२ अंशांपर्यंत गेला होता. कोरड्या व उष्ण हवेचे प्रमाण वाढले असून, बाष्पोत्सर्जन वाढल्यामुळे असह्य उकाडा जाणवत आहे. घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. आगामी काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होऊन पारा ३६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच हवामानदेखील कोरडे राहणार असल्याने नवरात्रोत्सवापर्यंत अकोलेकरांना ‘ऑक्टोबर हिट’चा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

थंडीआधी पावसाची शक्यता

सध्या वातावरणात उष्णता वाढल्यामुळे बंगालच्या उपसागरात आगामी काही आठवड्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊ शकते. हे क्षेत्र तीव्र स्वरूपाचे झाल्यास त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊन जिल्ह्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते.
मात्र, जर क्षेत्र कमी तीव्र राहिले तर पावसाची स्थिती निर्माण होऊ शकत नाही. मात्र, त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे ऑक्टोबर अखेरपर्यंत महाराष्ट्राकडे येऊन गुलाबी थंडीचे आगमन होऊ शकते. मात्र, सध्या तरी अकोलेकरांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Akolekar hit by October heat, mercury at 35 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.