अकोलेकर हरवतात दिवसाला २ मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 11:46 AM2021-02-17T11:46:06+5:302021-02-17T11:48:38+5:30

Mobile News वर्षभरात ६५० मोबाइल हरविल्याच्या घटना घडल्या असून त्यातील ४७२ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

Akolekar loses 2 mobiles a day | अकोलेकर हरवतात दिवसाला २ मोबाइल

अकोलेकर हरवतात दिवसाला २ मोबाइल

Next
ठळक मुद्देगेल्या वर्षांत ६५० मोबाइल हरवले ४७२ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : शहरातील गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, जनता भाजी बाजार, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि टिळक रोड यासह वर्दळीच्या इतर ठिकाणी खिशातून मोबाइल चोरणारे भुरटे चोर सक्रिय झाले आहेत. यासह विसरभोळेपणामुळे बसले त्याच ठिकाणी मोबाइल सोडून आल्याने वर्षभरात ६५० मोबाइल हरविल्याच्या घटना घडल्या असून त्यातील ४७२ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

गेल्या काही वर्षांत मोबाइल ही जीवनाश्यक बाब बनली आहे. मोबाइलशिवाय कुठलेच काम होणे सध्या तरी अनेकांसाठी अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या खिशात मोबाइल असतोच. त्यात काही लोक महागडे मोबाइल वापरतात. हीच बाब हेरून मोबाइल चोरटेही सक्रिय झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत खिशातून मोबाइल लंपास केल्याच्या ५४०पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत; तर ११० नागरिकांनी स्वत:च मोबाइल हरविले आहेत. यासंबंधीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून त्यातील ४७२ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

बसस्थानक, जनता भाजी बाजारात जाताय, मोबाइल सांभाळा!

गेल्या वर्षभरात म्हणजे २०२० मध्ये मोबाइल चोरीला गेल्याच्या सर्वाधिक घटना बसस्थानकात तसेच जनता भाजी बाजारात घडल्या आहेत. एस.टी.त चढताना आणि उतरताना गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे नागरिकांच्या खिशातील मोबाइल लंपास करीत आहेत. यासह सणासुदीच्यावेळी बाजारात जेव्हा नागरिकांची तोबा गर्दी होते, तेव्हाही मोबाइल चोरीच्या घटना सर्वाधिक प्रमाणात घडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांनी मोबाइल सांभाळावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हरवले ६५०, सापडले ४७२

वर्षभरात एकूण ६५० मोबाइल हरवले किंवा चोरीला गेले आहेत. संबंधित नागरिकांनी तशी फिर्याद पोलीस स्टेशनला दिली आहे. महत्प्रयासाने त्यातील ४७२ मोबाइलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून अद्याप १७८ मोबाइलचा शोध लागलेला नाही. मोबाइलचा शोध घेणे, ही तुलनेने जिकिरीची बाब असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.

खिशात महागडे मोबाइल घेऊन फिरताना तो चोरी होऊ नयेत किंवा हरवू नये, याची काळजी स्वत: नागरिकांनाच घ्यावी लागणार आहे. मोबाइलचा शोध घेण्यासाठी पोलीस कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करतात; मात्र त्यात बराच वेळ खर्ची घालावा लागतो. कधी कधी मोबाइलचा शोध घेण्यासाठी इतर राज्यातही जावे लागते. त्यामुळेच तपासाला वेळ लागतो.

- शैलेश सपकाळ, प्रमुख स्थानिक गुन्हे शाखा, अकोला

Web Title: Akolekar loses 2 mobiles a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.