‘अनंत कोटी, ब्रह्मांड नायक...’चा जयघोष! भक्तीमय वातावरणात ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 01:44 PM2024-06-15T13:44:45+5:302024-06-15T13:45:07+5:30
दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी
अकोला : हातात भगवे ध्वज, सोबत अश्व अन् टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘अनंत कोटी... ब्रह्मांड नायक... महाराजाधिराज... योगीराज... भक्त प्रतिपालक... शेगाव निवासी... समर्थ सदगुरू श्री संत गजानन महाराज की जय...,’ असा जयघाेष करत संत गजानन महाराज यांच्या पालखीसह वारकऱ्यांचे १५ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास डाबकी रोडमार्गे श्री राजराजेश्वर नगरीत आगमन झाले. श्रींच्या दर्शनासाठी झालेल्या भाविकांच्या अलाेट गर्दीने फुलांचा वर्षाव करत ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत केले.
५५ वर्षांची परंपरा जपत शेगाव येथून पंढरीसाठी प्रस्थान झालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे शनिवारी डाबकी रोडमार्गे श्री राजराजेश्वर नगरीत आगमन झाले. पहाटेपासूनच ‘श्रीं’च्या दर्शनासाठी डाबकी रोड परिसरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती. ‘श्रीं’च्या आगमनासाठी पालखी मार्गाची स्वच्छता करून भाविकांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. चौकाचौकात ‘श्रीं’च्या प्रतिमेचे पूजन आणि भक्ती गीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता. पालखी येताच पालखीवर फुलांचा वर्षाव करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. डाबकीराेडवरील खंडेलवाल भवन येथे वारकऱ्यांनी दुपारी भोजन घेतले.
...असा राहील शोभायात्रेचा मार्ग
१५ जून रोजी अकोला शहरातील शोभायात्रेचा मार्ग श्री गजानन महाराज संस्था प्रमुखांनी ठरवून दिलेल्या शहरातील मुख्य रस्त्यानेच शोभायात्रा निघणार आहे. सकाळी ११ वाजता श्रींचे पालखी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय गोडबोले प्लॉट जुने शहर येथून निघून. डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, विठ्ठल रुक्माई मंदिर, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, चिव चिव बाजार येथून मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगण येथे पालखीचा मुक्काम राहील. १६ जून २०२४ रोजी परतीचा मार्ग सकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी निवासमोरून, वन विभाग कार्यालय, खंडेलवाल भवन मार्गे गोरक्षण रोड, आदर्श कॉलनी शाळा क्रमांक १६ येथे दुपारी विश्रांती व महाप्रसादाचे वितरणानंतर संभाजीनगर, सिंधी कॅम्प मेन रोड,कारागृह समोरून, मेन हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, खोलेश्वर मार्गे सिटी कोतवाली चौक, राजराजेश्वर मंदिर समोरून, हरिहर पेठमधील श्री शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाऊन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहील.