स्वच्छता व एकतेसाठी धावणार अकोलेकर
By Admin | Published: October 31, 2014 01:24 AM2014-10-31T01:24:52+5:302014-10-31T01:24:52+5:30
अकोल्यात ‘एकता दौड’चे आयोजन.
अकोला: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यात एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडच्या माध्यमातून एकता आणि स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.
३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३0 वाजता शहरातील वसंत देसाई स्टेडियम येथून एकता दौड काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी जिल्हाधिकारी अरुण शिंदे स्वच्छता व एकतेची शपथ देतील. त्यानंतर काढण्यात येणारी एकता दौड शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत वसंत देसाई स्टेडियम येथे पोहोचणार आहे, व तेथेच दौडचा समारोप होणार आहे. एकता दौड दरम्यान, स्वच्छता अभियान राबवून, एकतेसोबतच स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे. या अभियानात सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्यांसह खासगी आस्थापना, स्वयंसेवी संस्था, शाळा, सामाजिक संघटना, व्यापारी मंडळ व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी केले आहे.