अकोलेकरांनो, ‘स्वच्छता अँप’चा वापर करा - मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:21 AM2017-12-29T01:21:38+5:302017-12-29T01:22:43+5:30
अकोला : केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून मनपा क्षेत्राला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले. शहरातील स्वच्छता व शौचालयांच्या बांधणीची राज्य शासनाच्या चमूने तपासणी करून शहराला हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर आता जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शहरात नव्याने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम राबवल्या जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मनपाने ‘स्वच्छता अँप’ तयार केले असून, या अँपचा वापर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानच्या माध्यमातून शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या घरी शौचालय नाही, त्यांचा शोध घेऊन त्यांना मनपा प्रशासनाच्या स्तरावर शौचालय बांधून देण्यात आले. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. मोहिमेचा उद्देश सफल झाला की नाही, हे तपासण्यासाठी राज्य शासनाच्या चमूने अकोला शहराची तपासणी केली. त्यानंतर शहर हगणदरीमुक्त झाल्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता जानेवारी व फेब्रुवारी २0१८ मध्ये शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २0१८’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.
‘स्वच्छता अँप’मुळे तक्रारींचा निपटारा!
शहरातील बाजारपेठ, घरालगतचा परिसर, सर्व्हिस लाइन, सार्वजनिक जागा किंवा मैदानांवर घाण, कचरा व अस्वच्छता दिसल्यास त्याची तक्रार मनपाच्या आरोग्य यंत्रणेकडे करण्याची गरज नाही. त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने ‘स्वच्छता अँप’ विकसित केले आहे. यामध्ये शहरात आढळणारे मृत प्राणी, कचर्याचे ढीग तसेच कचरा गाडी आली नसेल, तर त्यासंदर्भातील तक्रार स्मार्ट फोनच्या माध्यमातून नागरिकांना नोंदवता येणार आहे. तक्रार प्राप्त होताच संबंधित प्रभागाच्या आरोग्य निरीक्षकांकडून तक्रारीचे निराकरण केले जाणार आहे. अकोलेकरांनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘स्वच्छता अँप’ डाउनलोड करण्याचे आवाहन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.
आधी २९६ क्रमांक आता ५३!
एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्या शहरांमध्ये राबवल्या जाणार्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेत गतवर्षी अकोला शहर २९६ क्रमांकावर होते. आजरोजी शहर ५३ व्या क्रमांकावर आहे. शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतल्यास त्यामध्ये आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा आयुक्त वाघ यांनी व्यक्त केली.
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
शहरात स्वच्छता राखण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे, आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशासनाकडून मनपा आवार तसेच शहरात विविध भागात ‘स्वच्छता अँप’च्या माहितीसाठी स्टॉल लावल्या जात आहेत. गुरुवारी उपमहापौर वैशाली शेळके यांनी ‘स्वच्छता अँप’च्या स्टॉलला भेट देऊन नागरिकांना आवाहन केले आहे.
-