मनपाच्या रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:29 PM2019-10-05T13:29:36+5:302019-10-05T13:29:51+5:30
रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांनी तर सोडाच, खुद्द मनपाचे कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनीसुद्धा पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत महापालिक ा प्रशासनाच्यावतीने आयोजित रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांनी तर सोडाच, खुद्द मनपाचे कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनीसुद्धा पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे.
संपूर्ण देशभरात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिक ा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अकोलेकरांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
२ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्थानिक अग्रसेन चौक ते दुर्गा चौकपर्यंतच्या मार्गावर स्वच्छता अभियान, झाडे लावा-झाडे जगवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा ºहास या विषयांवर सर्व वयोगटातील महिला व पुरुष वर्गांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी स्वत: रांगोळी आणण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. तसेच नाव नोंदणीसाठी ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबर रोजी मनपातील आरोग्य विभागात संपर्क साधण्याची सूचना केली होती. स्पर्धेत प्रथम आलेल्या महिला व पुरुषांना प्रथम पुरस्कार तीन हजार रुपये, द्वितीय पुरस्कार दोन हजार तसेच तृतीय पुरस्काराची रक्कम एक हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात २ आॅक्टोबर रोजी या स्पर्धेकडे कोणीही फिरकले नसल्याचे समोर आले.
नियोजनशून्य कारभाराचा नमुना
रांगोळी स्पर्धेसंदर्भात आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांनी मनपातील सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून अवगत केले होते. आज रोजी मनपा आस्थापनेवर १८०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अवघे तीनशे ते चारशे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याने या स्पर्धेत सहभाग नोंदवला असता तर अकोलेकरांना सामाजिक संदेश देता आला असता. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा उत्तम नमुना यानिमित्ताने पाहावयास मिळाला.