‘जीएसटी’च्या पूर्वसंध्येला अकोलेकरांची सणासारखी खरेदी!
By admin | Published: July 1, 2017 12:38 AM2017-07-01T00:38:48+5:302017-07-01T00:38:48+5:30
इलेक्ट्रॉनिक्स, मोटारसायकल, ज्वेलर्स प्रतिष्ठानात गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : १ जुलैपासून देशभरात जीएसटी (वस्तू व सेवा कर) कायद्याची अंमलबजावणी होत असल्याने पूर्वसंध्येला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोटारसायकल आणि ज्वेलरी प्रतिष्ठानावर अकोलेकरांनी गर्दी केली. दिवाळी, दसरा, अक्षयतृतीया, गुढीपाडव्याच्या साडेतीन मुहूर्तांसारखी खरेदी अकोलेकरांनी केली.
शनिवारपासून देशभरात ‘वन नेशन वन टॅक्स’ जीएसटी लागू होत आहे. त्यात काही वस्तूंवर करवाढ होत असल्याने देशभरासह अकोल्यातही अनेक ठिकाणी सेल लावून ४५, ७०, ८० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली. विविध मॉडेल्सच्या उत्पादनावर केवळ ३० जूनपर्यंतच विशेष सूट असल्याचे जाहीर केल्याने अकोलेकरांनी कर वाचविण्यासाठी खरेदीसाठी गर्दी केली. ही गर्दी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असल्याची माहिती दुकानदारांनी दिली.
३० जून रोजी ही गर्दी जास्त झाली. शहरात असलेल्या १२ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रतिष्ठानातून अकोलेकरांनी एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटरसारख्या अनेक वस्तूंची खरेदी केली. अशीच गर्दी मोटारसायकलच्या खरेदीवरही होती. सोन्यावरही तीन टक्के अतिरिक्त कर लागणार असल्याने दागिने खरेदीसाठीदेखील अकोलेकर ज्वेलर्स प्रतिष्ठानात दिसलेत. ही गर्दी साडेतीन मुहूर्तांच्या एखाद्या सणाप्रमाणे जाणवत होती.
पावसाळ्याच्या दिवसांत विक्री वाढावी म्हणून कंपनी आणि डीलर्सकडून विविध युक्त्या, योजना आखून महासेल लावले जातात; मात्र यंदा जीएसटीची करवाढ होणार असल्याने जून महिना मंदीचा असतानाही व्यवसाय चांगला झाला.
-हरीश लाखानी, व्यावसायिक.
जीएसटी करवाढ होणार असल्याने मोटारसायकल कंपनीकडूनच विशेष आॅफर दिल्या गेल्यात. त्याचा लाभ घेण्यासाठी अकोलेकरांनी गर्दी केली. कॉलेजमध्ये नुकत्याच जात असलेल्या विद्यार्थ्यांनी जीएसटी आणि इतर योजनांचा लाभ घेतला.
-कमल आलिमचंदानी, मोटारसायकल डीलर्स.
जीएसटीच्या अंमलबजाणीच्या करवाढीचा धसका घेऊन अनेकांनी गेल्या आठ दिवसांत सराफा बाजारातून सोन्याचे दागिने खरेदी केलेत. दीडपट जास्त विक्री या दिवसांत झाली आहे.
- प्रकाश लोढिया, ज्वेलर्स संचालक.
जीएसटीच्या करवाढीसंदर्भात ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे अजूनही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. ३ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लागणार, हे खरे असले, तरी पूर्वीच्या व्हॅटच्या १३.५ टक्क्यांतून, केंद्रीय उत्पादन शुल्काच्या १५ टक्क्यांतून, राज्याच्या उत्पादन शुल्कातून, करावर कर लागण्याच्या करातून सुटकाही होणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या ग्राहकांसाठी वस्तू पूर्वीच्या कराच्या तुलनेत स्वस्त होणार आहे.
-सुरेश नागले, जीएसटी अधिकारी, अकोला.