अकोलेकरांना आवडतो चिवचिवाट...दाणापाण्याची केली व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 10:19 AM2021-03-20T10:19:42+5:302021-03-20T10:20:15+5:30
८९ टक्के लाेकांनी चिमण्यांसाठी घरासमाेर पाण्याचे भांडे ठेवल्याचे समाेर आले असून ८२ टक्के लाेकांनी दाण्यांची व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकाेला : निसर्गकट्टा, प्राणिशास्त्र विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला व महात्मा फुले महाविद्यालय पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यासाठी ऑनलाईन चिमणी गणना आयोजित करण्यात आली होती. या गणनेत ६९० लोकांनी सहभाग नोंदविला होता. या गणनेत ७ प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नाच्या अनुषंगाने नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्व्हेमध्ये सहभागी ८९ टक्के लाेकांनी चिमण्यांसाठी घरासमाेर पाण्याचे भांडे ठेवल्याचे समाेर आले असून ८२ टक्के लाेकांनी दाण्यांची व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व्हेबाबत अधिक माहिती देताना निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी सांगितले की, अकोल्याला जिल्ह्यातील चिमण्यांची स्थिती काय आहे व त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाय करावे, यासाठी या सर्व्हेचे आयोजन करण्यात आले होते. फक्त चिमण्यांची संख्याची आकडेवारी न काढता चिमणी संवर्धनासाठी किती लोक जागरूक आहे हे पाहणे हा या सर्व्हेचा मुख्य उद्देश होता. पहिल्या वर्षी जरी आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला पण दरवर्षी हा उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांना या चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
या चिमणी गणनेला डॉ. मिलिंद शिरभाते, सहप्राध्यापक, प्राणिशास्त्र विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय व डॉ. अमृता शिरभाते, प्राणिशास्त्र विभाग, महात्मा फुले महाविद्यालय पातूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या सर्व्हेमध्ये ज्या लोकांनी कृत्रिम घरटे लावण्याची इच्छा दर्शविली आहे त्यांना आम्ही घरटे उपलब्ध करून देणार आहोत. चिमणी वाचली पाहिजे, वावरली पाहिजे यासाठी अकाेलेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
अमाेल सावंत, पक्षिप्रेमी निसर्गकट्टा
अकोल्यातील परिसरात ५ ते १० चिमण्या दिसण्याचे प्रमाण ३३.९% , १० ते २० चिमण्या दिसण्याचे प्रमाण ३८%, ५० ते १०० चिमण्या दिसण्याचे प्रमाण २२.२% तर चिमण्या न दिसण्याचे प्रमाण ५.९% आहे.
अकोला जिल्ह्यात १२ महिने चिमण्या दिसण्याचे प्रमाण ४२% आहे, उन्हाळ्यात २४.१%, पावसाळ्यात १३.३% व हिवाळ्यात २०.६% चिमण्या दिसतात.
सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी ८९.७% लोकांनी आपल्या अंगणात चिमण्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवले आहे.
तर ८२.३% लोकांनी चिऊताईसाठी अन्नाची व्यवस्था केली आहे.
७२.५% लोकांनी चिमणीसाठी कृत्रिम घरटे लावले आहेत. तर ९५.४% लोकांनी त्यांच्या परिसरात चिमण्यांसाठी हक्काचा निवारा म्हणेज कृत्रिम घरटे लावण्याची मागणी केली आहे. तर फक्त 5% लोकांनी कृत्रिम घरटे लावण्यास नकार दिला आहे.
३८.४% भागांमध्ये मोबाईल टॉवरच्या जवळपास चिमण्या राहतात तर ६१.६% भागांमध्ये चिमण्या आहेत त्या भागात मोबाईल टॉवर नाही.