...तर अकोलेकरांचे नळ कनेक्शन होतील बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 04:33 PM2018-04-13T16:33:30+5:302018-04-13T16:36:34+5:30
अकोला: पाण्याची नासाडी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे.
अकोला: महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून आठ दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. आठव्या दिवशी नळाला पाणी आल्यानंतरसुद्धा बहुतांश नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र समोर येत आहे. नळाला तोट्या न लावणे, अंगणात पाणी शिंपडणे, दुचाकी-चारचाकी वाहने धुण्यासारखे प्रकार होत आहेत. अशा प्रकारे पाण्याची नासाडी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे.
अकोलेकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात अवघा साडेसात टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे धरणातील जलसाठ्यात किंचितही वाढ झाली नाही. उपलब्ध जलसाठा लक्षात घेता मनपाच्या जलप्रदाय विभागाने अकोलेकरांना दर आठव्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तसेच जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाण्याच्या नासाडीला लगाम घातला. उन्हाची दाहकता व शहरावरील संभाव्य पाणी टंचाई पाहता महापालिका प्रशासनाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. आठव्या दिवशी नळाला पाणी आल्यानंतरही काही सुज्ञ व स्वत:ला प्रतिष्ठित म्हणवून घेणारे नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. नळाला तोट्या न लावण्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. अंगणात पाणी शिंपडणे, दुचाकी-चारचाकी वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जात असल्याचे चित्र समोर आल्यानंतर आता प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून शहरातील ज्या भागात पाणी पुरवठा केला जाईल, त्या भागात नळ तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. पाण्याची नासाडी करणाºया नागरिकांचे नळ कनेक्शन बंद केले जातील.