अकोलेकरांवर जलसंकटाचे ढग!
By admin | Published: July 17, 2017 03:21 AM2017-07-17T03:21:58+5:302017-07-17T03:21:58+5:30
काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात घसरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत असून, काटेपूर्णा धरणातील जलसाठा दररोज वेगाने कमी होत आहे, त्यामुळे अकोलेकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
यावर्षी १७ जूननंतर १ जुलै रोजी बऱ्यापैकी जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला होता, तेव्हापासून दमदार पाऊसच नाही. त्यामुळे पिकांवर, पेरण्यावर परिणाम तर झालाच; पण धरणात जलसाठा संचय झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात आता केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला महापालिकेचा विस्तार झाला असून, २७ गावे नव्याने महापालिकेला जोडण्यात आली आहेत. या गावांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठीची सोय महापालिकेला करणे क्रमप्राप्त आहे; परंतु धरणातील जलसाठा वेगाने कमी होत असल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणातील जलसाठा हा दरवर्षी ५० टक्क्यांच्यावर असतो. तो यावर्षी कमी झाला असून, आजमितीस या धरणात ४९ टक्केच जलसाठा आहे.