अकोल्याची हवा खराब; धुळीचे प्रमाण खूप जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:55 AM2017-11-15T01:55:31+5:302017-11-15T01:56:00+5:30

शहरातील हवेत मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला पूरक ठरणार्‍या घटकांच्या प्रमाणाच्या तुलनेत तब्बल ५0 टक्के अधिक धूळ आहे. ही धुळ कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जुलै २0१६ पासून कृती आराखडा तयार करण्याचे बजावल्यानंतरही महापालिकेने काहीच केले नाही.

Akoli air spoiled; Dust is too much! | अकोल्याची हवा खराब; धुळीचे प्रमाण खूप जास्त!

अकोल्याची हवा खराब; धुळीचे प्रमाण खूप जास्त!

googlenewsNext
ठळक मुद्देकृती आराखडाच नाहीप्रदूषण मंडळाने महापालिकेला दिली कारवाईची नोटीसराज्यातील १७ प्रदूषित शहरांमध्ये समावेश

सदानंद सिरसाट । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील हवेत मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला पूरक ठरणार्‍या घटकांच्या प्रमाणाच्या तुलनेत तब्बल ५0 टक्के अधिक धूळ आहे. ही धुळ कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जुलै २0१६ पासून कृती आराखडा तयार करण्याचे बजावल्यानंतरही महापालिकेने काहीच केले नाही. या प्रकाराने महापालिका पर्यावरण, मानवी आरोग्याशी खेळत आहे, त्यासाठी गंभीर कारवाईचा इशारा देणारी नोटीस ३ नोव्हेंबर रोजी मंडळाने बजावली. विशेष म्हणजे, महापालिकेचा कृती आराखडा १६ नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळ मुख्यालय मुंबईत सादर करावा लागणार आहे. 
हवेची गुणवत्ता खराब असलेल्या राज्यातील १७ शहरांमध्ये अकोल्याचा समावेश आहे. त्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता तातडीने सुधारण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आदेश देण्यासोबत राष्ट्रीय हवा शुद्धता कार्यक्रम राबवण्याचेही बजावले. 
त्यावर राज्य विधिमंडळाच्या मार्च २0१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करण्यात आली. त्यावेळी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ शहरातील हवा गुणवत्ता सुधारण्याचा आराखडा तयार केला जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानुसार राज्यातील सर्व शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आराखडा तयार करण्याचा आदेश देण्यात आला; मात्र अकोला महापालिकेने हा विषय गांभीर्यानेच घेतला नाही. 
सजीवांना जगण्यासाठी प्रत्येक श्‍वासाला लागणार्‍या हवेची गुणवत्ता सुधारण्यातही महापालिकेची उदासीनता नागरिकांच्या जीवावर उठली आहे. आता १६ नोव्हेंबर रोजी मुख्यालयात हवेची गुणवत्ता सुधारणा करण्याचा आराखडा प्राप्त न झाल्यास महापालिकेवर गंभीर कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिशीत दिला आहे. 

शहरातील हवा खराब करणारे घटक
हवेचे प्रदूषण मुख्यत्वे वाहतूक, एकाच जागेवर सतत इंधनाचे ज्वलन, कोळसा, लाकूड, वाळलेले गवत यासारख्या जीवाश्म इंधनाचे जळणे, यासोबतच त्यामध्ये खराब रस्ते, निर्माणाधीन बांधकामे यातून मोठय़ा प्रमाणात धूळ निर्माण होते. 

हवेतील गुणवत्ता व धूळ मोजणीची ठिकाणे
अकोला शहरातील हवेची गुणवत्ता तपासणी विविध ठिकाणी केली जाते. त्यामध्ये रेल्वेस्थानकालगत शिवाजी पार्क, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ वसाहत फेज-२, लरातो वाणिज्य महाविद्यालय, सिव्हिल लाइन. 

मॉर्निंग वॉक ला जाणार्‍यांचेही आरोग्य धोक्यात
पहाटेच्या काळातील हवेची गुणवत्ता पाहता त्यामध्येही धुळीचे प्रमाण प्रचंड आहे. त्यातून घशाचे आजार, डोळ्य़ांची जळजळ यासारखे आजार बळावतात. धुळीचा सर्वात घातक परिणाम लहान मुलांवर होतो. श्‍वसनातून हवेतील घटक थेट त्यांच्या शरीरात पोहचतात. तेथेच चिकटून राहतात. त्यामुळे फुप्फुसांवर परिणाम होतो. 

दर दिवशी धुळीचे  प्रमाण सारखेच
तपासणीच्या दिवशीच्या तीन टप्प्यात दर दिवशी सारखेच धुळीचे प्रमाण आहे. त्यामध्ये सकाळी ६ ते दुपारी २ या काळात सरासरी १३५ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर, दुपारी २ ते रात्री १0 या काळात १४७ मायक्रोग्रॅम  प्रती घनमीटर, रात्री १0 ते पहाटे ६ पर्यंतच्या काळात १४0 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर, आरएसपीएम धूळ हवेत असल्याचा अहवाल आहे. 

धुळीचे घटक
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हवा तपासणीचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहे. हवेत धुळीचे प्रमाण १00 मायक्रोग्रॅम प्रती १ घनमीटरला धूळ (आरएसपीएम-रिस्पायरेबल सस्पेंडेड पार्टिकल मॅटर) एवढे सहन केले जाऊ शकते; मात्र शहरातील तीनही केंद्रांवर केलेल्या हवा तपासणीत हे प्रमाण सरासरी १४0 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर असल्याचा अहवाल आहे. 


हवेतील धुळीचे हे प्रमाण आरोग्यासाठी धोक्याचे आहे. दमा, अस्थमा, फुप्फुसांचे आजार वेगाने बळावतात. क्षयरोगही होते. अशक्त रुग्णांना प्रसंगी श्‍वसनासाठी ऑक्सिजनचाही पुरवठा करावा लागतो. 
- डॉ. अभिजित अडगावकर, 
सहयोगी प्राध्यापक, औषध विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

महापालिकेला सातत्याने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी पत्र दिले आहे. राज्य मुख्यालयानेही आता नोटीस देत आराखडा मागवला आहे. 
- राहुल मोटे, 
प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अकोला. 

Web Title: Akoli air spoiled; Dust is too much!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.