अकोट-अकोला रस्ता कामाच्या मुद्यावर कार्यकारी अभियंत्यास धरले धारेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:18 PM2020-01-11T13:18:15+5:302020-01-11T13:18:26+5:30
जिल्ह्यातील रस्ते व उड्डाणपुलाच्या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
अकोला: केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला. त्यामध्ये अकोला-अकोट-तेल्हारा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, अशी विचारणा करीत, या मुद्यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यास चांगलेच धारेवर धरले. त्यानुषंगाने जिल्ह्यातील रस्ते व उड्डाणपुलाच्या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला महापौर अर्चना मसने, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अकोला-अकोट-तेल्हारा या रस्त्याच्या कामासाठी गत दोन-अडीच वर्षांपासून रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे; मात्र रस्त्याचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नसल्याने, या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे हाल होत असून, रस्त्याचे काम केव्हा पूर्ण करण्यात येणार, असा प्रश्न आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी बैठकीत उपस्थित केला. या मुद्यावर आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे यांनी संताप व्यक्त करीत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांना चांगलेच धारेवर धरले. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न करणाºया कंत्राटारावर कारवाई करण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. रस्ता कामासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाºया वाहनांवर वन विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आल्याच्या मुद्यावरही लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अकोला विमानतळ विस्तारीकरण, जिल्ह्यातील रस्ते कामांची सद्यस्थिती व अकोला शहरात सुरू असलेल्या उड्डाणपूल कामाचा आढावा घेत, रस्ते आणि उड्डाणपुलाच्या कामांना गती देऊन पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील टेलिफोन सेवा कंपन्यांच्या कामासह सुपर स्पेशालिटी कामाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.