अकोटः प्रत्यक्ष काम न करता रस्त्याचे देयक काढण्याचा प्रयत्न; चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:20 AM2021-07-28T04:20:18+5:302021-07-28T04:20:18+5:30
ग्रामपंचायत शहापूर, रूपागड येथील लोकप्रतिनिधीने सुचविलेल्या सन २०१९-२०२० अंतर्गत गावातील काँक्रीट रस्ता बांधकाम हे प्रत्यक्ष न करता ९ लाख ...
ग्रामपंचायत शहापूर, रूपागड येथील लोकप्रतिनिधीने सुचविलेल्या सन २०१९-२०२० अंतर्गत गावातील काँक्रीट रस्ता बांधकाम हे प्रत्यक्ष न करता ९ लाख ५४ हजार १०८ रुपयांचे खोटे मूल्यांकन नोंदवून तसेच कामाच्या पूर्णत्वाचे प्रमाणपत्र तयार करून ही रक्कम मंजूर करणे आणि देयक सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी अकोट पंचायत समितीमध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता वासुदेव किसन तुपसुंदरे यांना निलंबित सुद्धा करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता गटविकास अधिकारी अशोक शिंदे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. दरम्यान, या चौकशीअंति दोषींवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
--------------------------
अकोट नगर परिषद रस्तेसंदर्भात चौकशीची मागणी
अकोटः नगर परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेस स्थगिती देण्याबाबत व जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना गटनेता मनीष कराळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मनीष कराळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शहरातील कामाची अंदाजपत्रके १४ व्या वित्त आयोग व इतर निधीतून तांत्रिक मान्यताप्राप्त करून आणली आहेत. त्याची तांत्रिक मंजुरी फी नगर परिषदेने संबंधित विभागाकडे भरली. ती अंदाजपत्रके नगर परिषदेकडे धूळखात पडल्याचा आरोप कराळे यांनी केला आहे. निधी कमी असताना जास्त रकमेची अंदाजपत्रके का बनवली, त्यामुळे चौकशी करावी, अशी मागणी न.प. गटनेते मनीष कराळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.