अकोट बाजार समितीत चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:17 AM2021-04-05T04:17:02+5:302021-04-05T04:17:02+5:30
अकोटः येथील बाजार समितीच्या आर्थिक हिताचे सर्वधन करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावरील गैरव्यवहारातील मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय पथकाची नियुक्ती ...
अकोटः येथील बाजार समितीच्या आर्थिक हिताचे सर्वधन करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावरील गैरव्यवहारातील मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या चौकशी पथकाला १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचा आदेश सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक व्ही.डी. कहाळेकर यांनी दिले आहेत.
शेकडो शेतकरी भागधारक असलेल्या बाजार समितीत मदुल प्रशासकीय व आर्थिक गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येत आहेत. त्यापैकी एका आर्थिक वर्षातील अंकेक्षण अहवालातील गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुधारित चौकशी आदेश दि. २६ मार्च रोजी काढण्यात आले. या चौकशी पथकाचे प्रमुख अप्पर विशेष लेखापरिक्षक आर. एम. जोशी आहेत. तसेच या पथकात सहाय्यक म्हणून प्रतवार पर्यवेक्षक एस. एस. खान, बाळापूरचे सहाय्यक सहकार अधिकारी डी. डी. गोपनारायण यांचा समावेश आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा आर्थिक वर्षातील अंकेक्षण टिपणीतील गंभीर मुद्द्यांचा विशेष अहवाल अप्पर विशेष लेखापरिक्षक यांनी सादर केला होता. अहवालाच्या अनुषंगाने बाजार समितीस प्राप्त अहवालावर खुलासा
सादर करण्यास सुचित केले होते. बाजार समितीने सहसचिवाच्या स्वाक्षरीने खुलासा सादर केला आहे, परंतु खुलासा हा वस्तुस्थितीदर्शक नसून, समाधानकारक नसल्याने खुलासा ग्राह्य धरता येऊ शकत नसल्याने त्रिसदस्यीय पथकाचे चौकशीचा आदेश पारीत करण्यात आला आहे. या आदेशात दोष दुरुस्ती अहवाल मुद्दा क्रं. १ ते ९ बाबत माहीती, अपात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याबाबत, वसुली पात्र बाजार फी, बाजार फी वसुलीच्या पध्दतीमुळे सुटलेले हिशेब पट्ट्यातील बाजार फीची आकारणी, भाव व वजनातील फरकामुळे कमी वसुली झालेली बाजार फी, बाजार शुल्क. सोबत दिलेल्या गोषवारानुसार खुलासा, भाडे करार तपासणी, उपबाजारा बाबतची माहिती, अनुज्ञप्ती विभागातील मुद्द्यावर माहिती, कापुस अनुज्ञप्ती माहिती, कापुस खरेदी /विक्री व्यवहार व बाजार फी बाबत, तसेच हिशेब पट्ट्यांबाबत व अडत्याचे व्यवहार व माहिती आदी गंभीर मुद्याचा समावेश आहे. चौकशी पथकाने १५ दिवसांत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे दि. ९ एप्रिलपर्यंत चौकशी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या चौकशी पथकाला सभापती/ सचिवाने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे सुचित केले आहे. दरम्यान बाजारात समितीमध्ये चौकशी सुरू आहे. त्यामुळे बाजार समिती सचिव राजकुमार माळवे यांची प्रशासकीय कारकिर्द संशयास्पद आहे. अशा परीस्थितीत माळवे सचिव पदावर राहणे उचीत होणार नाही अशी आमची धारणा आहे. त्यामुळे संचालक मंडळाची विशेष सभा तात्काळ बोलाविण्यात यावी, सभेपुढे सचिव राजकुमार माळवे यांना पुढील आदेशापर्यंत तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी यापूर्वीच संचालकांनी केली आहे.
-----------------------------------
अप्पर विशेष लेखापरिक्षक दिलेल्या अकोट बाजार समितीमधील
अंकेक्षण अहवालातील मुद्द्यांवर चौकशी करण्यासाठी तीन सदस्य समितीची नियुक्ती केली आहे. चौकशी अहवाल मुदतीत मागविण्यात आला आहे.
-व्ही. डी. कहाळेकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला.