अकोट : विहिरीबाहेर निघताच अस्वलाने ठोकली धूम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:59 AM2017-12-25T01:59:10+5:302017-12-25T02:15:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : तालुक्यातील वस्तापूर शेतशिवारात २२ डिसेंबर रोजी रात्री विहिरीत पडलेले अस्वल वन विभागाच्या पथकाने २३ डिसेंबर रोजी रात्री बाहेर काढले. बाहेर येताच अस्वलाने बाजीवरून उडी घेत जंगलाकडे धूम ठोकली.
वस्तापूर शिवारातील शहादेव कासदे यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये एक अस्वल पडले. विहिरीमध्ये भरपूर पाणी होते; परंतु विहिरीतील काठावर अस्वल बाहेर पडण्याकरिता धडपडत होते. अस्वल विहिरीत पडल्याने गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती. याबाबतची माहिती वन विभाग व अकोट ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक संजय पार्डीकर यांच्यासह वनअधिकारी व निसर्गप्रेमींनी घटनास्थळावर धाव घेऊन विहिरीमध्ये बाज सोडण्यात आली होती, त्यानंतर जाळे सोडण्यात आले. अस्वल जाळ्याच्या साहाय्याने वर येताच जंगलाकडे धूम ठोकली. काही दिवसांपूर्वी अकोली जहागीर परिसरातील विहिरीत एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती.
गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांचा सातपुड्याच्या पायथ्याजवळील शेतशिवारांमध्ये संचार वाढला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत वन विभागाने सुरक्षिततेची उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.