पीएम किसान योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकेत उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 12:28 PM2021-05-17T12:28:03+5:302021-05-17T12:29:43+5:30
Akot News : आर्थिक तंगीत असलेल्या लोकांनी दोन हजार रुपये व इतर पैसे काढण्याकरीता मोठी गर्दी केली.
- विजय शिंदे
अकोटः कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे असताना नागरिकांकडून मात्र हे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत. शासनाचे निर्बंध असतानाही बँकांसमोरील गर्दी कमी होताना दिसत नाही. असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यातील अकोट येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत सोमवारी पहावयास मिळाला. केंद्र शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले आहेत. दरम्यान या काळात आर्थिक तंगीत असलेल्या लोकांनी दोन हजार रुपये व इतर पैसे काढण्याकरीता मोठी गर्दी केली. सोमवारी सकाळी बँक उघडतात बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी प्रचंड गर्दी करत बँकेत प्रवेश घेतला. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडविल्या गेले.
कोरोना चा प्रादुर्भाव रोखणारी शासनाची स्थानिक यंत्रणा सपशेल फेल ठरली आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेणे गरजेचे असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुद्धा कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक ग्राहकांच्या जीवाशी खेळत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.