अकोट : नगर परिषदेलगत सुरू असलेले बांधकाम थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:48+5:302021-05-01T04:17:48+5:30
अकोट : येथील नगर परिषद क्षेत्रातील प्रस्तावित डी.पी. रस्त्यावर सुरू असलेले अवैध बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी प्रहार ...
अकोट : येथील नगर परिषद क्षेत्रातील प्रस्तावित डी.पी. रस्त्यावर सुरू असलेले अवैध बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी प्रहार सेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. बांधकाम बंद न पाडल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
प्रहार सेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, येथील नगर परिषदेलगत मागील बाजूस मंजूर विकास आराखड्यानुसार १५ मीटर रुंदीचा डीपी रस्ता नगर परिषदेने अधिग्रहित केला आहे. त्यानुसार डीपी रस्ता नगर परिषदेच्या ताब्यात आहे. यापूर्वी या रस्त्यासाठी विविध योजनांनुसार लाखो रुपये खर्च करून रस्त्याचे काम केले आहे; परंतु या रस्त्यावरील अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने हटविले होते. त्या जागेचा वाद न्यायालयात सुरू असल्याचे समजते. दरम्यान, आता या वादग्रस्त जागेवर बांधकाम सुरू असून, नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रहार सेवकांनी केला आहे. नगर परिषदेने संबंधितास बांधकाम दिलेल्या परवानगीची चौकशी करून, अवैध बांधकाम तात्काळ थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना प्रहार सेवक विशाल भगत, अविनाश शेरकर, पंकज चिंचोळे, ऋषी लिल्हारे, विजय लिल्हारे, ऋषी हरणे, अनिकेत पोतले आदी उपस्थित होते.