अकोट : तपासणीच्या नावाखाली मेळघाटातील आदिवासींच्या घरात नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:26 AM2018-01-19T01:26:17+5:302018-01-19T01:27:53+5:30
पोपटखेड : विविध मागण्यांसाठी मूळ गावात गेलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांमध्ये वन विभागाने १८ जानेवारी रोजी शोधमोहीम राबवली. या मोहिमेच्या नावाखाली पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांची नासधूस करण्यात आली, तसेच त्यांचे जेवण फेकून दिल्याचा आरोप विष्णू राऊत यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोपटखेड : विविध मागण्यांसाठी मूळ गावात गेलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांमध्ये वन विभागाने १८ जानेवारी रोजी शोधमोहीम राबवली. या मोहिमेच्या नावाखाली पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांची नासधूस करण्यात आली, तसेच त्यांचे जेवण फेकून दिल्याचा आरोप विष्णू राऊत यांनी केला आहे.
मेळघाटमधून पुनर्वसन होऊन मौजे गुल्लरघाट, धारगड, केलपाणी, बारुखेडा, आमोना, सोमठाणा बु., सोमठाणा खु. नागरतास या गावांचे अकोट तालुक्यामधे पुनर्वसन झाले होते. पुनर्वसित गावांमधील नागरिक त्यांना शेती मिळत नसल्याने २५ डिसेंबर २0१७ रोजी आमोना मार्गे पोच मार्गाने मेळघाटातील पूर्वीच्या गावी पोहोचले होते. पूर्वीच्या गावी जाऊन पुनर्वसित आदिवासी नागरिकांना चोवीस दिवस झाले आहेत. या चोवीस दिवसांपासून ते शांततेने आंदोलन करीत आहेत. १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान गुल्लरघाट, धारगड, बारुखेडा, नागरतास या गावांमध्ये वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी तपासणीच्या नावाखाली आदिवासी नागरिकांच्या साहित्याची नासधूस केली. तसेच त्यांच्या जेवणाचीही नासाडी केली. तसेच पुनर्वसित आदिवासी लोकांशी असभ्य वागणूक केली, अशी माहिती पुनर्वसित आदिवासी ग्रामस्थ विष्णू राऊत यांनी दिली. राऊत यांनी सांगितले, की आम्ही सर्व आदिवासी गेल्या २४ दिवसांपासून शांततेने आमच्या मागणीकरिता आंदोलन करीत आहोत. आम्ही मेळघाटमधील जंगल तसेच जंगली प्राणी, वन विभाग कर्मचारी, अधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही; परंतु वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देत आहेत. आम्हाला जोपर्यंत शेती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन शांतपणे सुरूच ठेवणार आहोत, असेही ते म्हणाले. वन विभागाकडून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिल्यास काही विपरीत घडले, तर याला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशारा विष्णू राऊत यांनी दिला आहे.