अकोटात आपत्ती निवारणाचे साहित्य धूळ खात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 03:09 PM2019-06-29T15:09:15+5:302019-06-29T15:09:51+5:30
पूरस्थितीचा सामना करण्याकरिता महसूल यंत्रणेला देण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन साहित्य सामग्री तहसील कार्यालयात धूळ खात पडली आहे.
- विजय शिंदे
अकोट: तालुक्यात पावसामुळे तसेच धरणातील पाणी सोडण्यात येत असल्याने नदी-नाले दुधडी भरून वाहत आहेत. जास्त पाऊस झाल्यास अकोट उपविभागातील ४१ गावांना पुरापासून धोका निर्माण होतो. गत काही वर्षांपासून पावसाळ्यातील संकट व त्यानंतर महसूल यंत्रणेची धावपळ निरर्थक ठरते. दरम्यान, अनेकजण वाहून जातात. गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत अकोट तालुक्यात ६७९.४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसामुळे शेततळे, धरणाच्या जलसाठ्यात बुडून मृत्यू झाले आहेत. पुरापासून दुर्दैवी घटना घडल्यानंतरही प्रशासन झोपेत असल्याचे दिसत आहे. पूरस्थितीचा सामना करण्याकरिता महसूल यंत्रणेला देण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन साहित्य सामग्री तहसील कार्यालयात धूळ खात पडली आहे. अकोट उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय व काही ग्रामपंचायतींमध्ये हे साहित्य अडगळीत पडलेले आहे. स्वच्छता व निगा ठेवलेली नाही. बोटमधील मशीन काढलेली असून, तीही धूळ खात पडलेली आहे. अनेक ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात जॅकेट, ट्युब हे उंदराचे खाद्य झाले असून, निरुपयोगी झाले आहे. अकोट तहसील कार्यालयात पूरनियंत्रण कक्ष उघडण्यात आल्याचे दिसले नाही. केवळ एका रजिस्टरवर पावसाची नोंद घेतल्याचे आढळून आले. राम भरोसे सुरू असलेल्या तहसील कार्यालयाने पावसाळ्यातील संकटाचा सामना करण्यासाठी साहित्य व बोटसह ‘अलर्ट’ राहणे गरजे झाले. या दुर्लक्षित व गंभीर प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक झाले आहे.
अद्याप दमदार पाऊस कोसळला नसला तरी संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना तर सोडाच, आपत्ती निवारणाचे साहित्यही धूळ खात पडलेले आहे. अकोट तहसीलमध्ये आपत्ती निवारण केंद्रही अद्ययावत नाही. दुसरीकडे अकोट उपविभागातील ४१ गावांना भविष्यात पुराचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तहसील कार्यालयाचे मात्र या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. अकोटात आपत्ती निवारणासाठी मिळालेली बोट तहसीलदारांच्या निवासस्थानी भंगारमध्ये पडलेली असल्याचे आढळले. या बोटीचे इंजिन काढून ते तहसील कार्यालयात ठेवण्यात आले आहे.