अकोट : व्यापार्यांच्या खराब उडिदाची प्रतवारी फेडरेशनने सुधारली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:09 AM2018-01-22T02:09:21+5:302018-01-22T02:09:44+5:30
अकोला : अकोट खरेदी केंद्रावर व्यापार्यांकडून खरेदी केलेला निकृष्ट उडीद गोदामात आणल्यानंतर त्याची प्रतवारी सुधारण्याचा आदेश चक्क महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयातील अधिकार्याने दिल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोट खरेदी केंद्रावर व्यापार्यांकडून खरेदी केलेला निकृष्ट उडीद गोदामात आणल्यानंतर त्याची प्रतवारी सुधारण्याचा आदेश चक्क महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयातील अधिकार्याने दिल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार व्यापार्यांकडून खरेदी केलेल्या उडीदप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी केला जात आहे, अशी तक्रार अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पुंडकर यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.
खासगी व्यापार्यांकडून होणारी शेतकर्यांची लूट थांबवण्यासाठी शासनाने हमीभावाने मूग, उडिदाची ऑनलाइन खरेदी प्रक्रिया ३ ऑक्टोबरपासून सुरू केली. जिल्हय़ात पणन महासंघाने अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या चार केंद्रांवर मूग, उडीद खरेदीची सोय केली. नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा एफएक्यू दर्जाचा मूग, उडीद खरेदी केला जातो. त्याचवेळी नाकारलेला माल परत न्यावा लागतो. अकोट खरेदी-विक्री संस्थेच्या केंद्रात शेतकर्यांनी आणलेला उडीद केंद्रातील ग्रेडर्सनी नाकारला. त्यामुळे शेतकर्यांनी तो खासगी व्यापार्यांना विकला. त्यावेळी व्यापार्यांनी त्यांच्याकडून सात-बाराच्या प्रतीही घेतल्या. त्याआधारे व्यापार्यांनी तोच उडीद नंतर शासनाच्या खरेदी केंद्रात विक्री केला. त्या हजारो क्विंटल उडिदाचा साठा वखार महामंडळाच्या गोदामात करण्यासाठी अकोला येथे वाहनाद्वारे पाठविण्यात आला. त्या ठिकाणी वखार महामंडळाच्या ग्रेडर्सनी उडीद एफएक्यू दर्जाचा नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांना कळवत नाकारला. त्यावर अकोट खरेदी-विक्री केंद्रातील संबंधित ग्रेडर्सना याबाबत जाब विचारण्याची नोटीसही तत्कालिन मार्केटिंग अधिकारी जे.एन. मगरे यांनी बजावली. तसेच उडीद अकोटला परत करण्यात आला. तो उडीद अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती रोडवर अनेक दिवस पडून होता. गेल्या १५-२0 दिवसांत अकोला येथे नेण्यात आला. जवळपास २९00 क्विंटल खराब असलेल्या उडिदावर प्रक्रिया करून वखारच्या गोदामात जमा करण्यात आला. तसेच उडिदाची रक्कमही अदा करण्यात आली. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी तराळ यांना विचारणा केली असता त्यांनी फेडरेशनच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी हनुमंत पवार यांच्या आदेशाने उडीद जमा केल्याचे सांगितले. शेतकर्यांचा मूग, उडीद खरेदी करण्यासाठी २0 जानेवारीपर्यंतची मुदत असतानाही त्याचा शेतकर्यांना कोणताच फायदा झाला नाही. त्याउलट व्यापार्यांना हाताशी धरून भ्रष्टाचार करण्यात आला, या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी पुंडकर यांनी तक्रारीत केली आहे.