अकोट : एक नामनिर्देशन पत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:21+5:302021-07-04T04:14:21+5:30
अकोट : तालुक्यातील समाविष्ट असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. शनिवारी मुंडगाव ...
अकोट : तालुक्यातील समाविष्ट असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. शनिवारी मुंडगाव पंचायत समितीसाठी पुरुष एक नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती नायब तहसीलदार हरीश गुरव यांनी दिली.
अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे भरण्यास दि. २९ जूनपासून रोजी सुरुवात झाली होती. तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन व पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या चार जागांवर पोटनिवडणूक होत आहे. ही नामनिर्देशनपत्रे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करावयाची आहेत. नामनिर्देशनपत्रे भरताना उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र व शपथपत्र संगणकीकृत प्रणालीद्वारे प्रिंटआउट सादर करणे गरजेचे आहे. मतदार यादीची साक्षांकित प्रत, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र, राजकीय पक्षाने प्राधिकृत केलेल्या उमेदवारांचे नमुना ब, नवीन बँक खाते, दोन छायाचित्रे, गुन्हेगारी पार्श्वभूमी, स्थावर-जंगम मालमत्ता आदी शपथपत्रे अशा गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील कोणतीही माहिती/रकाना कोरा ठेऊ नये, निरंक किंवा लागू नाही, असे लिहावे. रकाना कोरा असल्यास नामनिर्देशन पत्र नाकारले जाऊ शकते, शिवाय जिल्हा परिषद गटासाठी एक हजार रुपये आणि पंचायत समिती गणाकरिता सातशे रुपये अनामत रक्कम आहे. नामनिर्देशनपत्रे ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत भरता येणार आहेत, असे नायब तहसीलदार हरीश गुरव यांनी सांगितले.