अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचा राज्यात दुसरा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:22 PM2019-01-18T12:22:56+5:302019-01-18T12:23:26+5:30
अकोला: केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील केंद्रशासित प्रदेशासह सर्व राज्यांतील पोलीस ठाण्यांचा एका विशेष पथकाद्वारे सर्व्हे केल्यानंतर यामध्ये विविध निकषांवर अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
- सचिन राऊत
अकोला: केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील केंद्रशासित प्रदेशासह सर्व राज्यांतील पोलीस ठाण्यांचा एका विशेष पथकाद्वारे सर्व्हे केल्यानंतर यामध्ये विविध निकषांवर अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक सातारा जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याला मिळाला असून, अकोट ग्रामीण पोलीस ठाणे देशातून ५९ व्या क्रमांकावर आले आहे. अकोट ग्रामीण पोलिसांच्या योग्य कारभारामुळे त्यांनी अकोला पोलिसांची मान राज्यभर गौरवाने उंचावली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका विशेष पथकाने तीन महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील संवेदनशील तसेच दंगलीने कुप्रसिद्ध असलेल्या अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात धडक देऊन अचानक सर्वेक्षण केले होते. यामध्ये जनसंपर्क, गुन्हे शोध, दोषसिद्धी, तक्रार देण्यासाठी आलेल्यांना वागणूक तसेच हद्दीत घटना घडल्यानंतर किती वेळात प्रतिसाद देण्यात येते, तक्रारकर्त्यांची दखल कशाप्रकारे घेतल्या जाते, ठाणेदारांची कर्मचाऱ्यासोबत वागणूक, महिला व बालकांना देण्यात येणाºया वागणुकीची या पथकाने बनावट तक्रारकर्ते पाठवून तपासणी केली होती. यामध्ये अकोट ग्रामीणचे ठाणेदार मिलिंद बहाकर यांचे कामकाज या पथकाने अचानक तपासल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला दिलेली वागणूक सौजन्यपूर्वक आणि नागरिकांशी असलेला संपर्क योग्य असल्याचे समोर आले. यासोबतच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांचेही मार्गदर्शन योग्य असल्याचे दिसून आले. या पोलीस ठाण्यातील वाहनांवरील जीपीएस सिस्टीम, वाहनांची देखभाल, ठाण्याची इमारत भौतिक सुविधा या सर्वच विषयांवर सर्वेक्षण केल्यानंतर त्यामध्ये अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार राज्यातील पोलीस ठाण्यांच्या तुलनेत योग्य असल्याचे समोर येताच केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पथकाने या पोलीस ठाण्याला राज्यात दुसरा क्रमांक दिला असून, सातारा येथील पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक आला आहे. अकोट ग्रामीण पोलीस ठाणे देशात ५९ व्या क्रमांकावर असल्याने अकोला पोलिसांच्या इतिहासात प्रथमच या सर्व्हेत अकोला जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचा क्रमांक लागला आहे.
राजस्थानमधील पोलीस ठाणे देशात ‘नंबर वन’
देशातील पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचे तपासणी आणि सर्वेक्षण गृहमंत्रालयाने केल्यानंतर यामध्ये राजस्थानमधील एका पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक आला आहे, तर केंद्रशासित प्रदेशातील अंदमान निकोबार येथील पोर्टब्लेअर पोलीस ठाण्याच्या देशात द्वितीय क्रमांक आला आहे. या यादीत राज्यातील सातारा आणि अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याची कामगिरी झळकल्याने महाराष्ट्र पोलिसांची मान गौरवाने उंचावली आहे.