रस्ता वाहून गेल्याने अकोट-शेगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 03:12 PM2019-07-31T15:12:22+5:302019-07-31T15:12:28+5:30
सोमवारी संततधार पावसामुळे मोहाडी नदीला पूर येऊन यामध्ये शेगाव-अकोट महामार्गावरील पाटसूल फाटा ते आलेवाडी दरम्यानचा रस्ता वाहून गेला.
नया अंदुरा : अकोट-शेगाव रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. या मार्गावर अनेक पुलाचे निर्माण कार्य सुरू असलेल्या ठिकठिकाणी पर्यायी पूल संबंधित कंपनीने तयार केले नाहीत. सोमवारी संततधार पावसामुळे मोहाडी नदीला पूर येऊन यामध्ये शेगाव-अकोट महामार्गावरील पाटसूल फाटा ते आलेवाडी दरम्यानचा रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
अकोट ते शेगाव मार्गावर पुलाचे बांधकाम चालू असताना कोणत्याही पर्यायी पुलाची व मार्गाची व्यवस्था केलेली नाही. यामुळे पुलाजवळील पर्यायी रस्ता खचल्याने २४ तासांपासून अकोट-शेगाव महामार्ग बंद पडला आहे. शेगाव ते अकोट महामार्गाची कामे सुरू आहेत. संबंधित कंत्राटदाराने कोणतेही नियोजन न करता पुलाची कामे सुरू केल्याने बाजूने काढलेले रस्ते खचत असल्याने तसेच खोदून ठेवल्याने दर पावसाळ्यात वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. महामार्गावरील अनेक पुलांची निर्माण कार्य सुरू असल्यामुळे पर्यायी पुलाजवळील रस्ता अरुंद आहेत. तसेच पावसामुळे रस्ता खचल्याच्या भीतीमुळे अकोट-शेगाव महामार्गावरील एसटी महामंडळाची बस गेल्या २५ ते ३० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.